चंद्रपूर, दि. ६ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर चारा वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.
शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांत ट्रिगर-१ दुष्काळ घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा मोठ्या प्रमाणावर बाहेर विक्रीसाठी जाण्याची शक्यता असल्याने पशुधनासाठी भविष्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ही प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.
आदेशानुसार हिरवा चारा, कडबा, कुट्टी, पेंढ, टीएमआर तसेच इतर सर्व प्रकारच्या पशुखाद्याची जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून बाहेर वाहतूक व विक्री करता येणार नाही.
मात्र, शासकीय योजनेंतर्गत होणारी चारा वाहतूक तसेच पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश १ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.
पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि चारा वाहतूकदारांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.










