गोंडपिपरी : धाबा वनपरिक्षेत्रातील धाबा शेतशिवारात वाघिणीच्या पावलांचे ठसे (पगमार्क) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक शेतकरी मिथलेश्वर झाडे यांच्या शेत परिसरात हे ठसे आढळले असून, ते कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. या भागात वाघिणीचा पिल्लांसह वावर असल्याची चर्चा सुरू झाल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाबा शेतशिवार जंगलालगत असल्याने गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान, मिथलेश्वर झाडे यांच्या शेत परिसरात मोठ्या आकाराचे पावलांचे ठसे आढळून आले. अनिल वामनराव डोंगरे यांनी सतर्कता दाखवत हे पगमार्क कॅमेऱ्यात टिपले. हे ठसे वाघिणीचे असून तिच्यासोबत पिल्ले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पगमार्कची नेमकी ओळख तसेच वाघिणीचा वावर याबाबत वनविभागाच्या प्रत्यक्ष पाहणी व तपासणीनंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे.
सध्या शेतशिवारात विविध पिकांच्या कामांना वेग आला असून, शेतकरी व शेतमजुरांना पहाटेपासून तसेच सायंकाळपर्यंत शेतात काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत वाघिणीचा पिल्लांसह वावर असल्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः पिल्लांसोबत असलेली वाघीण जवळ आल्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.
वनविभागाकडे गस्त वाढविण्याची मागणी
पगमार्क आढळलेल्या परिसरात वनविभागाने तातडीने पाहणी करून त्यांची अधिकृत पडताळणी करावी, तसेच संभाव्य वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप बसवावेत, अशी मागणी धाबा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर शेतशिवारात वनकर्मचाऱ्यांची गस्त वाढवून शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन
पगमार्कची अधिकृत ओळख आणि वन्यप्राण्यांच्या वावराबाबत स्पष्टता होईपर्यंत शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. शेतात एकट्याने जाणे टाळावे, शक्यतो समूहाने शेतात जावे तसेच पहाटे व सायंकाळच्या वेळेत विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वन्यप्राणी दिसल्यास त्याचा पाठलाग न करता तातडीने वनविभागाला माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.











