
राहुरी -प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची अनुभूती व्हावी या दृष्टिकोनातून राहुरी तालुक्यातील धानोरे येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघेवस्ती येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत बाल आनंद मेळाव्याचे दिनांक १८/१/२०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते.या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शाळेच्या सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष श्री.भरत दिघे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बाल आनंद मेळाव्यात शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी फळे ,भाजीपाला, विविध तृणधान्ये, खाद्यपदार्थ दुकाने, शालेय स्टेशनरी,किराणा वस्तू, पाणी बॉटल,पतंग इ.स्टॉल खाऊगल्ली मध्ये पाणीपुरी, अप्पे, पास्ता,इडली सांबर, डोसा,कच्छी दाबेली,वडापाव,जिलेबी, चना, ओली भेळ ,चहा यांसारखे वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणले होते. १० ते १:३० या वेळेत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.अवघ्या ३ ते ३:३९ तासांमध्ये २९७५६ रुपयांची आर्थिक उलाढाल या बाल आनंद मेळाव्यात झाली.
या मेळाव्यात विद्यार्थ्यांचे पालक,ग्रामस्थ, नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांनी आणलेल्या वस्तू पालक व ग्रामस्थांनी खरेदी केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान, खरेदी विक्री,नफा – तोटा, खरी कमाई,वस्तू विक्रीचे कौशल्य, व्यवहार ज्ञान करताना येणारा अनुभव या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. स्वतः जवळील वस्तू विकल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद झळकत होता.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेत सातत्याने विविध सहशालेय उपक्रम राबविले जातात.विद्यार्थ्यांच्या मनावर असलेला अभ्यासाचा ताण दूर होऊन विरंगुळा मिळावा व व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे तसेच विद्यार्थ्यांची विक्री कौशल्य विकसित होऊन अर्थाजन करून श्रमप्रतिष्ठा मूल्यांची रुजवण होण्यासाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात येत असल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रभाकर शिंदे सर यांनी प्रास्ताविकात मांडले.
यावेळी दानशूर पालक व ग्रामस्थ यांच्या योगदानातून बांधलेल्या बहुउद्देशीय व्यासपीठाचे उद्घाटन मुख्याध्यापक श्री.प्रभाकर शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यासपीठ उभारणीसाठी श्री. डॉ.सुनिल वाणी,श्री.दत्तू वाणी,श्री.संदीप पर्वत,श्री.यशवंत दिघे,श्री.आकाश दिघे,श्री.सोमनाथ दिघे,श्री.राहुल दिघे,श्री.गणेश दिघे , जयराम दिघे यांचे सहकार्य लाभले.व्यासपीठावरील सजावटीसाठी श्री. रविंद्र दिघे यांचे सहकार्य लाभले.
शालेय भौतिक सुविधांच्या पूर्ततेसाठी श्री.भरत दिघे,श्री.अरुण दिघे,श्री.अनिल वाणी यांनी भरीव देणगी जाहीर केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती,माता पालक संघ, शिक्षक पालक संघ ,सांस्कृतिक समिती,पालक, ग्रामस्थ, मुख्याध्यापक श्री.प्रभाकर शिंदे सर, श्रीम.विद्याताई उदावंत मॅडम, श्रीम.सुनिता ताजणे मॅडम, श्रीम.मनिषा शिंदे मॅडम व श्रीम.सरगम दिघे मॅडम इत्यादींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र बोकंद सर व आभार श्री.सोमनाथ अनाप सर यांनी मानले.











