नागपूर – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिपाई पदभरती परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ उडाला आहे. रविवारी नागपूर येथील रायसोनी महाविद्यालय रिया टॉवर येथे दुपारी २.३० वाजता परीक्षा सुरू झाली. मात्र, काही मिनिटांतच सॉफ्टवेअरच्या बिघाडामुळे परीक्षा थांबवावी लागली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतही परीक्षा सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली.
शनिवारीही (२१ डिसेंबर) झालेली ही परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली होती. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेतही संगणकांवर चुकीची प्रोफाईल उघडणे, सॉफ्टवेअर बंद पडणे अशा समस्या निर्माण झाल्या. परीक्षा नियंत्रकांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त होईल, असे आश्वासन दिले, मात्र अनेक तास उलटूनही परीक्षा सुरू झाली नाही.
परीक्षेतील वारंवार तांत्रिक अडचणींमुळे परीक्षार्थ्यांनी गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला. काही विद्यार्थ्यांनी आरोप केला की, तांत्रिक अडचणी मुद्दाम निर्माण करून निवडक उमेदवारांना फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. यापूर्वीही पेपर सेव्ह केल्यानंतर उत्तर बदलत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या.
भरती प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधी व उमेदवारांकडून करण्यात आला आहे. एका जागेसाठी ४० लाख रुपयांची मागणी झाल्याचे म्हटले जात आहे. परीक्षेतील वारंवार घडणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे परीक्षार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
पुन्हा परीक्षा घेण्यासह संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. वारंवारच्या गोंधळामुळे परीक्षार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.












