डॉ. अशोक जिवतोडे यांच्या उपस्थितीत प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न
चंद्रपुर : सीमावर्ती भागात शस्त्रांच्या वापरात मुली व मातांचे अतोनात नुकसान होते, त्या विस्तापित होतात. पर्यायाने संपुर्ण समाज उध्वस्त होतो. त्यामुळे अशा निराधार मुली व मातांना जर शिक्षित व संवर्धित केले, तर याच मुली व माता परत त्या समाजात जावून समाज घडविण्याचे कार्य करतात. त्यासाठीच बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन हे बसेरा-ई-तबस्सुम च्या माध्यमातून जम्मु-काश्मीर येथे सामाजिक एकता व शांतता प्रस्थापीत करण्याचे कार्य करीत असल्याचे अधिक कदम यांनी जनता महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सांगितले.
बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनचे अध्यक्ष अधिक कदम यांचे सामाजिक एकता या विषयावर प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्री-लीला सभागृहात आज (दि.२) ला पार पडले.
या प्रेरणादायी कार्यक्रमात मोटीव्हेशनल स्पिकर अधिक कदम, अध्यक्ष स्वरुपात जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, प्रमुख पाहूणे चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जिवतोडे, सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, अदिती कदम आदी उपस्थित होते.
या निमित्ताने संस्थेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जिवतोडे, सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे यांच्या तर्फे अधिक कदम व अदिती कदम यांचा सत्कार करण्यात आला.
मुळचे पुणे येथील असलेले अधिक कदम हे महाविद्यालयीन जिवनात असतांना १९९७ मधे जम्मू कश्मिर येथे एका सहलीकरीता गेले असता त्यांना तेथील आतंकवादी व मिलिटरी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या पालकांच्या मुलींचे व मातांची वाताहत दिसून आली. त्यांनी वयाच्या १९व्या वर्षी जम्मू येथील कश्मिर पंडीत रेफ्युजी कॅम्प ला भेट दिली. कारगील युध्दाच्या वेळी त्यांनी रेफ्युजींसाठी पुढे जावून कार्य केले. त्यानंतर त्यांनी युनीसेफ़च्या सौजन्याने सुरु असलेल्या युध्दात वाताहत झालेल्या मुलांसाठीच्या संवर्धन प्रकल्पात काम केले.
कदम यांनी २००२ मधे बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनची स्थापना केल्यानंतर काश्मिर परीसरातील पाच जिल्ह्यात बसेरा-ई-तबस्सुम हे शेल्टर हाऊस सुरु केले. या शेल्टर हाऊस मधे सीमावर्ती भागातील आतंकवाद व मिलिटरी कारवाईत विस्तापित व निराधार झालेल्या मुलामुलींचे शिक्षण, संगोपन तथा पतीचे निधन झालेल्या महिलांना आर्थीक तथा भौतिक मदत करण्यात येते.
एलओसी जवळ राहणा-या लाखो नागरीकांना वैद्यकीय सेवेअभावी मृत्युमुखी पडतांना कदम यांनी बघीतले व २०१५ मधे काश्मिर लाईफलाईन व २०१७ मधे जम्मू लाईफ लाईन ही सीमावर्ती भागातील लोकांकरीता ॲम्बुलंस सेवा सुरु केली.
सध्या देशभरात सामाजिक एकता व शांतता मोहिम घेवुन महाविद्यालयीन विद्यार्थी व सामान्य नागरीकांना सामाजिक एकतेच्या दृष्टीने प्रेरीत करण्यासाठी ते फिरत आहेत. याच अनुशंगाने ते स्थानिक जनता महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आले होते.
अधिक कदम यांना २०१० मधे मदर टेरेसा अवार्ड, २०११ मधे युवान्मेश अवार्ड, २०१२ मधे दि स्पिरीट ऑफ़ मास्टेक अवार्ड, २०१२ मधे युथ आयकॉन, २०१६ मधे आयसीए अवार्ड, सावित्री अवार्ड, २०१७ मधे एनबीए अवार्ड, आदी पुरस्कार मिळाले आहेत.