कोरची (गडचिरोली) भाषा ही व्यक्तीच्या व त्या त्या भाषिक समाजाच्या अस्मितेचा भाग असते. एक भाषा मृत झाली तर त्यासोबतच एक संस्कृतीही नष्ट होत असते. आजवर जगात अनेक भाषा मृत झालेल्या आहेत. आपली मातृभाषा टिकून रहावी असे वाटत असेल तर त्या भाषेचा प्रत्यक्ष व्यवहारात वापर झाला पाहिजे. मात्र बरेचदा बेगडी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी आपण परकीय भाषा व त्यातील शब्दांचा वापर करून मातृभाषेकडे दूर्लक्ष करतो. आपली भाषा व संस्कृती जिवंत राहावी असे वाटत असेल तर आपल्या मनात आपल्या मातृभाषेविषयी अभिमान असावा, असे मत डॉ. प्रकाश वट्टी यांनी मांडले.
‘मराठी भाषा गौरव दिवस’ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, मराठी भाषेत आजवर अनेक समृद्ध साहित्य निर्माण झाले आहे. या साहित्यातून मराठी संस्कृतीचा झरा सतत पाझरत राहिला आहे. वैविध्यपूर्ण जीवनानुभव आणि भाषेतील रसाळपणा यामुळे मराठीतील साहित्यविश्व लक्षवेधी ठरले आहे. मात्र भाषेच्या संवर्धनासाठी केवळ साहित्यनिर्मिती पुरेशी ठरणारी नाही. भाषा टिकण्यासाठी ती रोजगाराभिमुख, व्यवसायाभिमुख असायला हवी. मात्र मराठी भाषेतील महत्त्वाचे असे वैद्यकीय शिक्षण , विधीशिक्षण, तंत्र शिक्षण अजूनही मराठी भाषेत उपलब्ध करून दिले जात नाही. भाषा टिकण्यासाठी या विविध व्यवहार क्षेत्रांत मराठीचा वापर होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाची भूमिका महत्त्वाची ठरते, असे मत त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
स्थानिक कोरची येथील वनश्री महाविद्यालयातील मराठी विभागाद्वारा कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘ मराठी भाषा गौरव दिवस’ या कार्यक्रमाचे आभासी पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आर. एस. रोटके हे होते. तर मार्गदर्शक म्हणून नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रम्हपुरी येथील डॉ. प्रकाश वट्टी हे होते. यावेळी प्रा. आर. एस. रोटके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्य निर्मितीचा आढावा घेऊन त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. आजवर अनेक साहित्यिकांनी मराठी भाषेची थोरवी वर्णन केली आहे. या मातृभाषेला जिवंत ठेवण्यासाठी आपण जास्तीत जास्त मराठी शब्दांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मराठी विभागप्रमुख प्रा. पी. के. चापले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सी. एस. मांडवे यांनी केले. या आभासी कार्यक्रमात महाविद्यालयातील तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थी व संशोधन केंद्रातील संशोधकही सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी मौलिक सहकार्य केले.