तळोधी (बा ):प्रतिनिधी.
नागभिड तालुक्यातील सावरगाव- वाढोणा मार्गावरुन वाढोणा येथील मुलीकडे स्कुटिने जात असलेल्या महिलेचा हार्वेस्टरच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.१७ मे रोजी १.२५ वाजता सावरगाव येथील अजय बोरकर यांच्या घरासमोर घडली. मृतक महिलेचे नाव कुसुम अरुण उकुंडे (वय 50 वर्ष) रा.नेरी ता.चिमूर असे असून हार्वेस्टर चालकाचे नाव तेजराज बोरकर रा.भेंडाळा ता . सिंदेवाही असे आहे.
सद्यस्थितीत सावरगाव परीसरात शेतकरी हार्वेस्टरने धान कापणी,मळणी करित आहेत.दरम्यान सावरगाव वरुन वाढोणाकडे हार्वेस्टर मशीन वाहन धारक तेजराज बोरकर हा जात असताना मागूनच स्कूटीधारक राजेश ईश्वर बावणे रा.दिघोरी,नागपुर (एम. एच.३१ सी.एक्स.८८७१) स्कुटीने ओव्हरटेक करून वाढोणाकडेच मृतक महीला कुसुम अरुण उकुंडे रा.नेरी ता.चिमूर यांना स्कुटिवर बसवून जात होता.हि महीला वाढोणा येथील मुलीची प्रकृती ठीक नसल्याने तिला बघायला जात असल्याची माहिती मिळाली.दरम्यान सावरगाव – वाढोणा मार्गावरील सावरगाव येथील अजय बोरकर यांच्या घराजवळ हार्वेस्टर या वाहनाच्या जोरदार धडकेत ती जागीच ठार झाली. अपघात झाल्याचे कळताच हार्वेस्टर चालक पळून गेल्याची माहिती मिळाली.अधिक तपास तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजितसिंग देवरे यांच्या मार्गदर्शनात उप पो.नि.चंद्रकांत लांबट व विजय वाकडे करीत आहे.