चंद्रपूर – लोहार समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व रोजगाराभिमुख उत्थानासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची दीर्घकालीन मागणी अखेर मान्य झाली आहे. महाराष्ट्र लोहार समाज संघटनेने गेल्या अनेक वर्षांपासून हा मुद्दा शासनदरबारी लावून धरला होता.
मुंबईतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या मायको ओबीसी बैठकीत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत लोहार समाजाच्या प्रतिनिधींनी महामंडळ स्थापनेची मागणी ठामपणे मांडली होती. या मागणीची दखल घेत महायुती सरकारने लोहार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील लोहार समाज संघटनेच्या पदाधिकारी व समाजबांधवांनी यानिमित्त हंसराज अहीर यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन आभार मानले. १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमात लोहार समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सतत पाठपुरावा करणाऱ्या अहीर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
हंसराज अहीर यांनी या यशात लोहार समाजातील पदाधिकारी व समाजबांधवांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. लोहार समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी समाजबांधवांना दिले.
मधुकर शेंडे, जितेश मेश्राम, आनंद बावणे, प्रमोद मेश्राम, जमूनादास सोनटक्के, मदन सोनटक्के, वासूदेव शेंडे, राजेश सोनटक्के, उत्तम शेंडे, रवि बावणे, प्रमोद दाभेकर, प्रदीप शिरपूरकर, नागोजी सोनटक्के, विनोद धाबेकर, गोविंदा सोनटक्के, मेघश्याम दाभेकर, उमेश नाचनकर यांच्यासह अन्य समाजबांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.