मूल: मूल शहरातील किरकोळ वाद विकोपाला जाऊन धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने तीन जण जखमी झाले. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना दोन तासांत अटक केली. या हिंसक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
मूल शहरातील फिर्यादी बंडू परशुराम कामडे (वय ६४, व्यवसाय – शेती व आटा चक्की) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, वादाचे कारण दुचाकी बाजूला करून हातगाडी नेण्यावरून झाले. आरोपी नरेंद्र नामदेवराव कामडे आणि त्याची पत्नी मनीषा नरेंद्र कामडे यांच्यात चुलत भावासोबत वाद झाला, ज्याचे गंभीर स्वरूपात भांडणात रूपांतर झाले.
वादाच्या दरम्यान, आरोपींनी मिळून संगनमत करून प्रेम चरण कामडे आणि स्वप्नील सुभाष देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात हे दोघे गंभीर जखमी झाले, तर अविनाश चंद्रभान कामडे किरकोळ जखमी झाला.
या घटनेवरून मूल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८५/२०२४ नोंदवून भारतीय दंड संहितेच्या कलम १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, १०९ व ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंमका, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद तपास करून आरोपींचा माग काढला.
राजेश बंडू खनके (वय २६) ,सचिन बंडू खनके (वय २७) ,वैभव राजेश महागावकर (वय २३) ,कपिल विजय गेडाम (वय २३) , श्रीकांत नारायण खनके (वय २८) ,नरेंद्र उर्फ नरेश नामदेव कामडे (वय ४२) , मनीषा नरेंद्र कामडे (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत .सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली वॅगनार कार (क्र. MH-34-AA-4424) जप्त करण्यात आली आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमितकुमार आत्राम करत आहेत. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर, वर्षा आत्राम, तसेच इतर पोलीस कर्मचारी सक्रिय आहेत.
या प्रकरणात तात्काळ आणि अचूक कारवाई करून पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश मिळाले आहे.