विजयाचे कमळ फुलणारच याची पूर्ण खात्री – ना. मुनगंटीवार
जनतेचा प्रचंड सहभाग आणि ऊर्जेने भरलेली प्रचार रॅली
ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपुर व पोंभुर्णा येथे भव्य प्रचार रॅली
बल्लारपूर – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर व पोंभुर्णा शहरामध्ये भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचंड उर्जेने भारावलेली ही रॅली शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली होती.
यावेळी ना. मुनगंटीवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘ही सामान्य निवडणूक नसून विनाशाविरुद्ध विकासाचे युद्ध आहे. मी जात, पात, धर्म न पाहता जीव तोडून गरीबांची सेवा केली. विधानसभेत संसदीय आयुधांचा वापर करून अनेक कामे मार्गी लावलीत. पुणे विद्यापीठाचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ तर अमरावती विद्यापीठाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वशंजाना न्याय मिळवून दिला. भिडेवाड्यात स्मारक करण्याचा माझा संकल्प असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्प अर्पण करताना एक उत्तम वाक्य त्या ठिकाणी लिहिले होते. ‘बुद्धी असून उपयोग नाही जर मानवता समजत नसेल’, असे ते शब्द आहेत. राजकारणात जातीपातीचं विष कालवणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची सुरुवात ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ अशी केली आहे. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास सेवा भावनेतून केला. काँग्रेसचे लोक विकासावर मतदान मागत नाही तर जातीपातीच्या आधारावर मतदान मागतात. ते जातीपातीवर मत मागून लोकशाहीची थट्टा करत आहेत, असा आरोप ना. मुनगंटीवार यांनी केला. त्याचवेळी लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात सहभागी व्हा, मतदान करा आणि राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा, असे आवाहन ना. मुनगंटीवार यांनी केले.