गडचिरोली:- १० चकमकीत समावेश आणि १५ गुन्हे दाखल असलेल्या भामरागड दलमचा कमांडर आणि त्याच्या पत्नीने १४ ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ ३७ बटालियन समोर आत्मसमर्पण केले आहे.वरुण राजा मुचाकी उर्फ उंगा उर्फ मणिराम उर्फ रेंगु (२७) रा.पिडमिली ता. चिंतागुफा,जि. सुकमा (छ. ग) पत्नी रोशनी विज्या वाचामी (२४) रा.मल्लमपोडुर ता. भामरागड, जि.गडचिरोली असे आत्म समर्पित नक्षली दांपत्याचे नाव आहेत.
वरुण राजा मुचाकी हा २०१५ मध्ये कोटा एरिया मध्ये भरती होऊन सदस्य पदावर कार्यरत होता.२०१५ ते २०२० पर्यंत डीकेएसझेडसी गिरीधर तुमरेटी याचा अंगरक्षक म्हणून त्यांनी काम केला. नोव्हेंबर २०२० ते २०२२ पर्यंत भामरागड दलम मध्ये त्याची बदली झाली तो उपक्रम या पदावर होता.२०२२ पासून ते आजपावेतो वरुण भामरागड दलम कमांडर म्हणून कार्यरत होता. या कार्यकाळात त्याच्यावर एकूण १५ गुन्हे नोंद असून त्यामध्ये दहा चकमक व इतर पाच गुन्ह्यांचा समावेश आहे.तर त्याची पत्नी रोशनी ही सुद्धा २०१५ ला दलम मध्ये भरती झाली. २०१६ मध्ये तिची भामरागड दलामध्ये बदली झाली. २०१७ पर्यंत ती त्याच दलम मध्ये कार्यरत होती.त्यानंतर तिची अहेरी दलम मध्ये बदली झाली. २०२१ पर्यंत काम केल्यावर तिला गट्टा दलम मध्ये पाठविण्यात आले.२०२२ मध्ये तिला पार्टी मेंबर म्हणून भामरागड जन्म मध्ये पाठविण्यात आले. या कार्यकाळात तिच्यावर एकूण २३ गुन्हे दाखल असून त्यामध्ये १३ चकमक व इतर १० गुन्ह्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाने वरूण राजा मुचाकी उर्फ उंगा उर्फ मनिराम उर्फ रेंगु याच्यावर ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.तर रोशनी विज्या वाचामी हिच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमोरपणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र व राज्य शासनाकडून वरून राजा मुचाकी याला ५.५ लाख रुपये तर रोशनी विज्या वाचामी हिला ४.५ लाख रुपये जाहीर केले आहे. विशेष म्हणजे आत्मसमारपणानंतर पुनर्वसनाकरिता राज्य शासनाकडून पती-पत्नी असलेले नक्षलवादी सदस्यांना आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून १.५ लाख जाहीर केले आहे.असे एकूण ११.५ लाख रुपयांचे बक्षीस शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
एकेकाळी गडचिरोली जिल्हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जायचा परंतु मधल्या काळात मोठ्या चकमकीनंतर येथील नक्षलवाद जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे. त्यानंतर छत्तीसगड मध्ये देखील गडचिरोली सारख्याच कारवाया करण्यात येत आहेत.गेल्या वर्षभरापासून सुरक्षा यंत्रणांनी छत्तीसगडमधील नक्षल प्रभावित भागात केलेल्या कारवायांमध्ये नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दोन महिन्यापूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या छत्तीसगड दौऱ्यात मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपविणार असे वक्तव्य केले होते. त्यानंतर ४ ऑक्टोबरला नारायणपूर-दंतेवाडा या जिल्ह्यांच्या सीमावरती भागात ३१ नक्षलवादी मारले गेले. एकीकडे दंडकारन्यात नक्षलवाद्यांना घेरण्याचे काम सुरक्षा यंत्रणांनी केली आहे तर दुसरीकडे देशातील नक्षल चळवळीला प्रतिबंध लागावा व अधिकाधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थिक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबविण्यात आहे.त्यामुळे गेल्या दोन वर्षात २७ नक्षल्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
आज भामरागड दलम कमांडर वरुण राजा मुचाकी आणि पार्टी सदस्य व त्याची पत्नी रोशनी विज्या वाचामी या नक्षल दाम्पत्यांनी गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ ३७ बटालियन समोर आत्मसमर्पण केले आहे.त्यामुळे दक्षिण भागात नक्षल चळवळ बॅकफूटवर गेली आहे.