शिर्डी: शिर्डी पोलिसांनी आपल्या तत्परतेचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला आहे. आंध्रप्रदेशातून आलेल्या साईभक्तांचे २,७०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने गहाळ झाल्यानंतर, अवघ्या दोन तासांत तपास करून पोलिसांनी ते परत केले. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कार्यपद्धतीमुळे साईभक्तांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
अडबाला विरा वेंकटा आणि त्यांच्या पत्नीने श्री साईबाबांच्या दर्शनानंतर ३१ ऑगस्ट रोजी काकडी विमानतळावर जाण्यासाठी खाजगी स्विफ्ट डिझायर गाडी घेतली होती. मात्र, विमानात बसल्यानंतर त्यांना त्यांच्या २,७०,००० रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह एटीएम कार्ड असलेली पर्स गाडीतच विसरल्याचे लक्षात आले. गाडीचा क्रमांक किंवा चालकाची माहिती नसल्याने ते गोंधळले होते.
शिर्डी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि त्यांच्या पथकाने त्वरित तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भारत बलैय्या, पोलीस कॉन्स्टेबल गणेश घुले, आणि प्रसाद गोरे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाडीचा क्रमांक शोधून काढला. गाडीचालकाला चौकशीसाठी बोलावले असता, त्यालाही पर्स गाडीत विसरल्याची माहिती नव्हती. मात्र, पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता, पर्स सीटखाली सापडली.
पोलिसांनी तत्काळ साईभक्तांना पर्स परत केली, आणि त्यांच्या कौशल्यपूर्ण आणि जलद तपासासाठी साईभक्तांनी शिर्डी पोलिसांचे विशेष आभार मानले.