नागभीड: नागभीड तालुक्यातील ब्रिटिशकालीन घोडाझरी तलावाच्या कालव्याला धामणगाव माल गावाजवळ मोठा भगदाड पडल्याने आज दुपारी कालवा बंद करण्यात आला. या भगदाडामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, शेतांमध्ये पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी मध्यम प्रकल्प हा ब्रिटिशकालीन असून, या प्रकल्पातील पाण्याचा उपयोग सिंचनासाठी केला जातो. नागभीड व सिंदेवाही तालुक्यातील हजारो एकर शेतीला या तलावाच्या पाण्याचा पुरवठा होतो. घोडाझरी तलावापासून सोनापूर-गोविंदपूर मार्गे नवरगावपर्यंत ब्रिटिश काळात कालवा तयार करण्यात आला होता, जो आजही वापरला जातो.
दरवर्षी पडणारे भगदाड: ब्रिटिशकालीन नहराची सिंचाई विभागाने आजपर्यंत व्यवस्थित दुरुस्ती केली नसल्यामुळे दरवर्षी ठिकठिकाणी भगदाड पडत असतात. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. यंदाही 15 ऑगस्ट 2024 रोजी घोडाझरी तलावाचे पाणी कालव्याद्वारे शेतीला सोडण्यात आले होते. मात्र, आठवड्याच्या आतच, आज शुक्रवारी धामणगाव जवळील अरुण मेश्राम यांच्या शेतालगत कालव्याला मोठे भगदाड पडले, ज्यामुळे त्यांच्या शेतात पाणी साचले.
शेतकऱ्यांचा रोष:शेतकऱ्यांनी सिंचाई विभागाला या घटनेची तातडीने माहिती दिली, आणि दुपारी कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. परंतु, ही समस्या नवीन नाही. शेकडो वर्षे जुना हा कालवा आज ठिकठिकाणांहून जीर्ण झालेला आहे. अनेक वर्षांपासून याची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्यामुळे पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. दरवर्षीच हा कालवा फुटतो, आणि शेतकऱ्यांचे पिकांवर याचा परिणाम होतो.
प्रशासनाने लक्ष द्यावे:
कालवा फुटल्याने पाण्याची टंचाई निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने घोडाझरी तलावाच्या कालव्याची पक्की दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सिंचाई विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.