मूल (रोहित कामडे) :- विरई या लहानशा गावातून आशिष गोंगले यांनी पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवून गावाचा आणि कुटुंबाचा सन्मान वाढवला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे. माजी सरपंच तुळशिरामजी गोंगले यांचा नातू आणि सेवानिवृत्त शिक्षक दिलीप गोंगले यांचा मुलगा आशिषने आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने हे ध्येय साध्य केले आहे.
आशिषने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पूर्ण केले, आणि दहावीपर्यंतचे शिक्षण नवभारत विद्यालय, मूल येथे घेतले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. २०२१ मध्ये कोरोनामुळे अपयश आले, तरीही त्यांनी हार न मानता प्रामाणिकपणे अभ्यास करत राहिले. अखेर, २०२२ मध्ये यशस्वीपणे परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झाले.
आशिष म्हणतो, “नियमित अभ्यास, मेहनत, आणि अपार जिद्द यांच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते.” त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, काका-काकू, मोठे आई-बाबा, पत्नी, बहिण-भाऊ, आणि नातेवाईकांना दिले आहे, ज्यांनी त्यांना सतत प्रोत्साहित केले.
आशिषच्या या यशामुळे केवळ विरई गावातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे. त्यांची जिद्द आणि मेहनत इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या कर्तृत्वाने इतर युवकांना आपापल्या ध्येयांचा पाठपुरावा करण्याची प्रेरणा मिळत आहे.
आशिषच्या यशाकडे पाहून अनेक युवकांनी आशिषकडून प्रेरणा घेत आपली स्वप्नं साकार करण्यासाठी प्रोत्साहन मिळवावे. जिद्द, मेहनत आणि अपार धैर्य यांच्या जोरावर कोणत्याही कठीण परिस्थितीत यश मिळवता येते, हे आशिषने सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासामुळे युवकांना नवी उमेद मिळाली आहे.