अहेरी:- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राहुल कुमार यांची सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती होताच त्यांनी सर्वाधिक अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त अहेरी विधानसभा क्षेत्रातील निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे ८ दिवस असून प्रशासन सज्ज झाले आहे.अतिसंवेदनशील भागात मतदान प्रक्रिया राबविताना महसूल प्रशासनासोबतच पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहून काम करावे लागते.अश्यावेळी या ठिकाणी मतदानासाठी कश्याप्रकारे तयारी सुरू आहे याचा आढावा घेण्यासाठी नवनियुक्त निवडणूक निरीक्षक राहुल कुमार यांनी अचानक औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली येथील स्ट्रॉंग रूम ला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी त्यांनी येथील स्ट्रॉंग रूम, ईव्हीएम साठवणूक कक्ष तसेच मतदान प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या साहित्यांची पाहणी केली.तर अहेरी विधानसभा क्षेत्रातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची माहिती घेऊन उपविभागीय कार्यालय अहेरी येथे भेट दिली.तसेच ईव्हीएम कार्यान्वित करणाऱ्या चमुला मार्गदर्शन केले.यावेळी अहेरीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदित्य जिवने यांनी अद्यावत माहिती दिली.
व्यवेस्थेची पाहणी दरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आदित्य जिवने,सहाय्यक जिल्हाधिकारी ओंकार पवार,अहेरी उपविभागातील सर्व तहसीलदार तसेच अहेरीचे पोलीस निरीक्षक दशरथ मघमोडे उपस्थित होते.