गडचिरोली: महिला व मुलींच्या मूलभूत अधिकारासाठीचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. ग्रामीण भागात सत्तेतील मुख्य पदांवर महिला असल्या तरी अधिकार मात्र पती किंवा तिच्या घरातील पुरुषच वापरत असल्याचे दिसून येते.अश्यात राज्याच्या शेवटचा टोकावर आणि छत्तीसगड सीमेवर नव्याने स्थापन झालेल्या गर्देवाडा पोलीस मदत केंद्रातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी प्रभार सांभाळत महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करत जिल्ह्यालाच नव्हेतर संपूर्ण राज्याला एक महत्वाचा संदेश दिला आहे.
जिल्हा मुख्यालय पासून जवळपास २५० किलोमीटर अंतरावर व छत्तीसगड राज्याच्या सीमेवर नक्षल्यांची दहशत मोडून काढण्यासाठी तसेच अबुझमाडचा प्रवेशद्वार बंद करण्यासाठी एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथे १५ जानेवारी २०२४ रोजी येथे पोलीस मदत केंद्राची स्थापना केली.एक हजार ५०० जवानांचा फौजफाटा लावून तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्याहस्ते एकाच दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली होती.
हा गडचिरोली पोलिसांचा ६३ वा पोलीस मदत केंद्र असून या पोलीस मदत केंद्रात गर्देवाडा, नैताला, मुरेवाडा, मर्दकुही,हाचबोडी, कोईनवर्षी,हिक्केर आणि पैडी आदी अतिदुर्गम व नक्षलग्रस्त गावांचा समावेश आहे.या ठिकाणी एसआरपीएफचे अधिकारी व ५० जवान,सीआरपीएफ अधिकारी व ८० जवान तसेच ६० जिल्हा पोलीस अंमलदार असे जवळपास २०० पोलीस तैनात आहेत आणि नक्षलयांच्या दहशतीत डोळ्यात तेल घालून सुरक्षा देण्याचे काम करीत आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त पहिल्यांदाच याठिकाणी मोठ्या उत्साहात ध्वजरोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात स्वतंत्र पोलीस मदत केंद्राच्या प्रभार सांभाळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पुट्टेवार यांच्या हस्ते येथील ध्वजारोहण संपन्न झाला.छत्तीसगड राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस आणि नक्षल्यामध्ये चकमक सुरू आहेत.सध्या राज्याच्या सीमावर्ती भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यात दोन मोठ्या चकमकीत जवळपास ३९ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले आहे.काल ३० जानेवारी रोजी लगतच्या अबूझमाड जंगलात छत्तीसगड पोलीसांनी १० नक्षल्यांना ठार मारले.अश्या परिस्थितीत महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर कर्तव्य बजावने म्हणजे जिकरीचे असते.मात्र,कल्याणी पुट्टेवार यांनी हेडरी, वांगेतुरी आणि गर्देवाडा सारख्या अति संवेदनशील भागातील पोलीस मदत केंद्रात सेवा देत एक नवा विक्रम केला आहे.विशेष म्हणजे येथील प्रभारी अधिकारी सुट्टीवर असताना त्यांनी प्रभार हाती घेऊन सीमावर्ती भागात सुरक्षा देत महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी तिरंगा फडकविला.