गडचिरोली: जिल्हा परिषद गडचिरोली व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहन पर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्या अनुषंगाने चामोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा कुणघाडा रै च्या उपक्रमशील शिक्षिका कु. प्रीती प्रल्हाद नवघडे आणि धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कारवाफाचे उपक्रमशील शिक्षक जितेंद्र रायपुरे यांना नुकतेच झालेल्या एका कार्यक्रमात ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त रंजितसिंग डिसले गुरुजी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना नवनवीन उपक्रमांचे आदान प्रदान करण्यासाठी विनोबा ॲप हे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याला उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा जिल्हा व तालुका स्तरावर गौरव केला जातो. मार्च महिन्यातील तालुकास्तरीय पोस्ट ऑफ द मंथ विजेते कुमारी प्रीती प्रल्हाद नवघरे आणि जितेंद्र रायपुरे यांना पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार,डायट चे प्राचार्य धनंजय चापले,माध्यमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार,प्राथमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, ग्लोबल पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजीतसिंह डिसले, विनोबा ॲप चे जिल्हा समन्वयक गणेश शेंडे व चंदन रापर्तीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.