गडचिरोली:- छत्तीसगड राज्यातून आलेल्या रानटी हत्तीने लगतच्या तेलंगाणा राज्यात प्रवेश करताच गेल्या २४ तासात दुसरा बळी घेतला आहे.कारू पोशन्ना (५०) असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे.
३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील नागुलवाही गावाजवळून वाहणाऱ्या प्राणहिता नदी ओलांडून रानटी हत्तीने तेलंगाणा राज्यात प्रवेश केला.कुमरमभीम जिल्ह्यातील चिंतला मानेपल्ली तालुक्यात समाविष्ट बुरेपल्ली येथे मिरचीच्या शेतात काम करणाऱ्या अल्लूरी शंकर शेतकऱ्यावर हल्ला करत ठार केले.या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच आज ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात भात पिकाला पाणी घालत असलेल्या कारू पोशन्ना नामक शेतकऱ्यांवर त्या रानटी हत्तीने हल्ला करत ठार केले. गेल्या २४ तासात त्या रानटी हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे.
चिंतलामानेपल्ली तालुक्यात रानटी हत्तीचा वावर असलेल्या परिसरात पोलीस, वन आणि महसूल विभागाचे अधिकारी कर्मचार्यांना तैनात करण्यात आले असून त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या त्या रानटी हत्तीवर वन अधिकाऱ्यांनी नजर ठेवली असून त्याने बेजुर तालुक्यातील सुलुगुपल्ली परिसरात आपला मोर्चा वळविल्याचे सांगण्यात येत आहे.तर महाराष्ट्रात सुद्धा आलापल्ली वन विभागातील अधिकारी,कर्मचारी आणि आरआरटी ने देखील प्राणहिता नदीलगत ड्रोन कॅमेराने त्या रानटी हत्तीवर नजर ठेवली आहे.