गडचिरोली:छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रात दाखल झालेल्या रानटी हत्ती आता दक्षिण गडचिरोलीत देखील धुमाकूळ घालत आहे.धानोरा तालुक्यातून चव्हेला येथून घोट,पेडिगुडम आणि चौडमपल्ली वनपरिक्षेत्रातून तेलंगाणा राज्यात प्रवेश केलेल्या नर हत्तीने तेलंगाणा राज्यात एका शेतकऱ्याला तुडवून ठार केल्याची घटना बुधवार (३ एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास घडली. अल्लूरी शंकर रा.बुरेपल्ली ता.चिंतलमानेपल्ली जि. कुमरमभीम (असिफाबाद) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील काही वर्षांपासून ओडिशा, छत्तीसगड राज्यातून रानटी हत्तीच्या कळपाने गडचिरोलीच्या उत्तर भागात प्रवेश करत अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत.यात अनेक घरांचे नुकसान तर झालेच पण जीवितहानी देखील झाली आहे.नुकतेच एका रानटी नर हत्तीने छत्तीसगड राज्यातून धानोरा तालुक्यातील चव्हेला येथून चामोर्शी तालुक्यात प्रवेश करत ,मुलचेरा तालुक्यातील विविध गावांतून तेलंगाणा राज्यात प्रवेश केला आहे.मागील दोन दिवसांपासून या रानटी हत्तीचा पाठलाग सुरू असून आरआरटी सोबतच मार्कंडा, पेडिगुडम,चौडमपल्ली आणि अहेरी वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी वॉच ठेवले आहेत.
सदर रानटी हत्ती घोट वनपरिक्षेत्रातून पेडिगुडम,अहेरी आणि चौडमपल्ली वनपरिक्षेत्रातील विविध जंगल परिसरातून चपराळा अभयारण्यातील ठाकरी उपक्षेत्रातील नागुलवाही बिट मधून प्राणहिता नदी ओलांडून तेलंगाणा राज्यात प्रवेश केला.मुलचेरा तालुक्यातील नागुलवाही घाटावरून तेलंगाणा राज्यातील बुरेपल्ली हे गाव केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे.सदर शेतकरी हा आपल्या शेतात काम करीत असताना हत्तीने त्याला तुडविले.ही घटना तेलंगाणा राज्यातील कर्जेली वनपरिक्षेत्रात घडली आहे.सकाळपासून आलापल्ली वन विभागातील विविध वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांच्या संपर्कात असून देखील त्यांनी दुर्लक्ष केले अशी माहिती समोर येत आहे.
तेलंगाणा राज्यात हत्तीला पाहिजे तसा जंगल आणि पोषक वातावरण नसल्याने हत्ती परत येणार म्हणून मुलचेरा तालुक्यातील नागुलवाही घाटावर ड्रोन कॅमेराने वन विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.या घाटावर चपराळा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे, मार्कंडाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत,पेडिगुडम वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने,अहेरी वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी तसेच क्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षक नजर ठेवून आहेत.