गडचिरोली : मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली जबाबदारी कोणतीही हयगय होणार नाही याची दक्षता घेवून काटेकोरपणे पार पाडावी व मतमोजणीची प्रक्रिया यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिले.
12- गडचिरोली- चिमूर(अ.ज) लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल 2024 रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून दिनांक 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. याअनुषंगाने मतमोजणी पूर्वतयारीचा आढावा व अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय घोडके, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटिल, तसेच सर्व सहायक निवडणूक अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदारीनुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती करुन घेण्याचे व आवश्यक साहित्याची पूर्वपडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. सुरक्षा यंत्रणा, टपाली मतपत्रिका मोजणी पथक, मतमोजणी मनुष्यबळ व्यवस्थापन पथक, साहित्य व्यवस्थापन पथक, निवडणूकयंत्र सिलींग पथक, मतमोजणी समन्वय व अहवाल संकलन पथक या पथकांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सविस्तर आढावा घेऊन त्यांना आवश्यक सूचना केल्या. त्याप्रमाणेच मतमोजणीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त, आरोग्य सुविधा, स्वच्छता, इंटरनेट सुविधा, मिडिया कक्ष, याबाबतही माहिती घेऊन संबंधित नोडल अधिकाऱ्यांना जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याचे निर्देश दिले. मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या दिवशी मोबाईल वापरण्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिबंध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने सहायक निवडणूक अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. राहुल मीना(गडचिरोली) यांनी कायदेशीर बाबी व सर्वसाधारण सूचना, किशोर घाडगे (चिमूर) यांनी मतदानयंत्राद्वारे मतमोजणी, आदित्य जीवणे (अहेरी) यांनी व्हीव्हीपॅट मोजणी, कविता गायकवाड (आमगाव) यांनी पुर्नमतमोजणी, श्रीमती मानसी (आरमोरी) यांनी निकालाची घोषणा व अहवाल सादरीकरण, संदिप भस्के (ब्रम्हपूरी) यांनी मतदान यंत्राचे सिलींग या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.