गडचिरोली:- बाळंतपण हा स्त्रीचा पुनर्जन्म असतो. स्त्रीच्या गर्भावस्थेचा कालावधी साधारणपणे ३७ आठवड्यांचा मानला जातो त्यानंतर प्रसुती होणे अपेक्षित असते. परंतु काही कारणांनी या कालावधीपूर्वी प्रसुती होते याला अकाली प्रसुती असे म्हटले जाते.अशीच एक घटना समोर आली असून गरोदर मातेला प्रसुतीसाठी महिनाभर वेळ असताना अचानक आलेल्या प्रसूतीच्या कळामुळे घरच्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गरोदर मातेची अवस्था बघता प्राथमिक आरोग्य केंद्रातून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. १०८ रुग्णवाहिकेतून जिल्हा मुख्यालयात घेऊन जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे भर रस्त्यावर त्या गरोदर मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती होते. बाळ आणि मातेचा जीव धोक्यात आले असताना रुग्णवाहिकेत असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत बाळ आणि त्या मातेला धोक्यातून बाहेर काढले.आता नवजात बाळ आणि माता सुखरुप असून त्यांच्यावर कोरची येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील कोरची तालुक्यात समाविष्ट देऊळभट्टी (पाटील टोला) येथील लता मुकेश कोरेटी ही महिला गरोदर होती.प्रसूतीसाठी आणखी जवळपास महिनाभर वेळ होता.मात्र,बुधुवार (१५ मे) रोजी अचानक तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्या गरोदर मातेला वेदना सहन होत नसल्याने घरच्यांनी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखल केले.येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून प्रसुतीत गुंतागुंत असल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.कोटगुल वरून कोरची मार्गे गडचिरोलीकडे जात असताना जवळपास १६ ते १७ किलोमीटर अंतरावर बेतकाठी ते पांढरीगोटा दरम्यान घनदाट जंगलात रस्त्यावरील खड्ड्यामुळे झटक्याने लता कोरेटी हिची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.सदर गरोदर मातेला भयंकर वेदना असल्याने तिला प्रसूती झाल्याचे कळलेच नाही.सोबत असलेल्या पती मुकेश,नातेवाईक गिरजा कोरेटी आणि इलेश्वरी नैताम यांना प्रसूती झाल्याचे कळले.मात्र, लता कोरेटी ही साडीवर असल्याने बाळ अडकला होता.अश्या स्थितीत रुग्णवाहिकेत असलेल्या डॉ आतिष सरकार यांनी तत्परता दाखवत बाळाला व्यवस्थित बाहेर काढले. अशा स्थितीत बाळ आणि मातेच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी बाळ आणि मातेला गडचिरोली घेऊन न जाता त्याने आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.बाळ आणि माता सुखरूप असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गरोदर मातेसोबत महिला आरोग्य कर्मचारी नव्हते
प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने लता कोरेटी या गरोदर मातेला कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. १०८ रुग्णवाहिकेतून तिला जिल्हा मुख्यालयात पाठविताना सोबत एकही महिला कर्मचारी देण्यात आले नव्हते. सुदैवाने डॉ.आतिश सरकार यांनी तत्परता दाखवत,परिस्थिती हाताळत बाळ आणि महिलेला धोक्यातून बाहेर काढले. परंतु अशा परिस्थितीत बाळ आणि मातेच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गावातील उपकेंद्र बंद अवस्थेत ?
माता व बाल संगोपन आणि माता व बालमृत्यू रोखण्यासाठी अनेक खेड्यापाड्यात उपकेंद्र उघडण्यात आले आहेत.देऊळभट्टी जवळील नांगपूर येथे उपकेंद्र असुनही उपकेंद्र अक्षरशः बंद असल्याचे लता चे नातेवाईक सांगत आहेत. आठवडा भरापासून या ठिकाणी तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरू असल्याने येथील कर्मचारी सुद्धा याच हंगामात व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका रुग्णवाहिकेत दोन रुग्ण तरीही ‘त्या’ डॉक्टरची तत्परता
कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून गरोदर महिला लता कोरेटीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेत अस्वलीचा हल्ल्यात जखमी झालेला १२ वर्षीय हर्षद गणपत नरोटे देखील होता.हर्षद आपल्या वडिलांसोबत जंगलात तेंदुपत्ता संकलनासाठी गेला होता. तेंदूपत्ता संकलन करताना अचानक अस्वलीने हल्ला करून त्याला जखमी केले. असे दोन रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जात असताना अचानक रस्त्यावरील खड्ड्यामुळे लता कोरेटी हिचा भर रस्त्यावर रुग्णवाहिकेतच प्रसूती होते. दुसरीकडे अस्वलीचा हल्ल्यात जखमी झालेला हर्षद देखील तडफडत असताना त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत बाळ आणि मातेला धोक्यातून बाहेर काढून बाळ,माता आणि जखमी हर्षदला देखील त्यांनी कोरची ग्रामीण रुग्णालयात भरती केली.