भामरागड (गडचिरोली )-नुकतेच नागपूर येथे झालेल्या विभागीय मल्लखांब स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये १३ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेसाठी त्या सर्वांची निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, नागपूर द्वारा विभागीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा नूतन भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथे २९ व ३० नोव्हेंबर २०२३ दरम्यान पार पडल्या.यामध्ये लोक बिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करित प्राविण्य पटकावून आपली निवड राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी पक्की केली.यामध्ये १४ वर्षे वयोगट- सुहानी मडावी ,निता नरोटी,कोमल पुंगाटी,अभिनव दुर्वा, अर्जुन आलामी,सर्व वर्ग ८ वा. १७ वर्षे वयोगट-माधुरी मज्जी,मंजू होयामी,प्रांजली वाचामी,अक्षय मट्टामी, ओमकार मडावी, सुधाकर वड्डे सर्व वर्ग ९ वा. १९ वर्षे वयोगट-संगिता पुंगाटी,सुरेन्द्र काळंगा वर्ग ९वा.यांनी घवघवीत यश प्राप्त केले.पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थी व मल्लखांब प्रशिक्षक परमात्मा पंधरे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
प्रसिद्ध समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, मुख्याध्यापक श्रीराम झोडे तथा सर्व शिक्षकांनी प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.