आष्टी (श.)/ वर्धा : गोवा येथे ३७ वे नॅशनल गेम्स आयोजित करण्यात आले होते. त्यात आष्टी येथील रहिवासी आस्था रवींद्र गायकी यांना लोबा सिकाई फाईट या क्रीडा प्रकारात रौप्यपथक प्राप्त झाले आहे. इंडियन ऑलंम्पिक असोसिएशन, मिनिस्ट्री ऑफ युथ वेल्फेअर अॅण्ड स्पोर्ट गव्हरमेंट ऑफ इंडिया यांच्या वतीने २६ सप्टेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे ४३ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
देशातील २१ राज्यातील ११०० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील लहानआर्वी येथील रहिवासी असलेली आस्था रवींद्र गायकी हिने लोबा सिकाई फाईट या क्रीडा प्रकारात ४६ किलो वजनगटात जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंशी झुंज देत एका गुणाने मागे राहून रौप्यपदक प्राप्त केले. तिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्रातील १८ खेळाडूंनी भाग घेतला होता. यामध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदक खेळाडूंनी प्राप्त केले आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक व वडील रवींद्र गायकी यांना दिले. रवींद्र गायकी हे सिकाई मार्शल आर्ट या खेळाचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असून उत्तम प्रशिक्षक आहे. आस्थाच्या यशाबद्दल प्रीतम गायकी, हनुमान गायकी, आनंद गायकी यांच्यासह गायकी परिवार व इतरांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे.