गुजरात येथे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांनी संयुक्तपणे एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एटीएस आणि एनसीबीने 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून 86 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सागरी सीमेजवळ ड्रग्जचा पुरवठा होत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर तपास यंत्रणांनी तात्काळ ऑपरेशन सुरु केले. गेल्या दोन दिवसांपासून ते गुजरातच्या किनारी भागात ऑपरेशन करत होते. अशातच रविवारी रात्री त्यांनी 14 पाकिस्तानी नागरिकांना अमली पदार्थांसह अटक केली.
दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत गुजरात आणि राजस्थानमध्ये मेफेड्रोन या औषधाची निर्मिती करणाऱ्या चार युनिटवर छापे टाकून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो यांनी गुप्तचर माहितीच्या आधारे शुक्रवारी या युनिट्सवर संयुक्तपणे छापा टाकला. या छाप्यात 230 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.
एटीएसने 22 किलो मेफेड्रोन आणि 124 किलो लिक्विड मेफेड्रोन जप्त केले. याची किंमत सुमारे 230 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबादचे मनोहर लाल एनानी आणि राजस्थानचे कुलदीपसिंग राजपुरोहित यांनी मेफेड्रोन तयार करण्यासाठी युनिट्स स्थापन केल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली. त्यानंतर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली.