(कार्यालयीन प्रतिनिधि) दिव्यांग सर्व्हेक्षणाद्वारे प्राप्त माहितीच्या आधारे जिल्ह्यात दिव्यांगांच्या सर्व समावेशक कल्याणाचा कृती आराखडा तयार करावा,असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले. तसेच यासर्व कामकाजासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एक कर्मचारी नियुक्त करावा व जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण भवन दि.१९ पासून कार्यान्वित होईल,यादृष्टीने नियोजन करावे,असेही त्यांनी निर्देश दिले.
दिव्यांगाच्या कल्याणासाठी व स्वयंरोजगारासाठी विविध उपाययोजना राबविणेबाबत पालकमंत्री बच्चू कडू यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, समाज कल्याण अधिकारी पुंड तसेच विविध विभागांचे अधिकारी, तुकाराम बिडकर, विजय कानेकर आदी उपस्थित होते.
दिव्यांगांच्या कल्याणासंदर्भात यावेळी आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाची माहिती सादर करण्यात आली. यासाठी दिव्यांगाची नोंद ही प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर घेण्यात यावी, तसेच सर्व नगर पालिका, पंचायत समिती, मनपा अशा स्थानिक स्वराज्य संस्थास्तरावर एक नोडल अधिकारी नियुक्त करावे. जिल्हास्तरावर दिव्यांग कल्याण भवन कार्यान्वित करून तेथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, दिव्यांगांसाठी राबवाव्याच्या सर्व उपाययोजनाबाबत येथून कार्यान्वयन करावे,याची सुरुवात दि.१९ पासून तयार करावी. तसेच दिव्यांगत्व निर्माण होऊ नये यासाठी गर्भधारणापूर्व, प्रसूतीपूर्व राबवाव्याच्या उपाययोजना, तसेच दिव्यांगत्व असल्यास त्याचे लवकरात लवकर निदान व आवश्यक ते उपचार करून दिव्यांगत्व कमी करणे वा बरे करणे. तसेच दिव्यांगांचे शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, निवारा इ. सुविधा सेवा देऊन त्यांचे पुनर्वसन करणे. यासाठी शासनाच्या संबंधित विभागानिहाय जबाबदारी निश्चित करून कालबद्ध कृती आराखडा तयार करावा,असे निर्देश पालकमंत्री कडू यांनी दिले.