तब्बल 700 विद्यार्थ्यांचा सहभाग
वरोरा( चंद्रपूर) :- सूर्याच्या उपासनेमुळे अनेक आजार बरे होण्यास मदत होते .आधुनिक युगात माणसाचे जीवन यंत्रवत झाले असून जगभरातील अनेक जण नैराश्याच्या खाईत लोटले जात आहेत. सूर्यनमस्कारामुळे मनुष्याची इंद्रिय सक्षम होण्यास मदत होते, त्यामुळे नैराश्यावर मात करण्याकरिता आणि शरीरस्वास्थ्यासाठी सूर्यनमस्कार आवश्यक असल्याचे प्रतिपादन लोक सेवा मंडळ ,भद्रावती चे सचिव नामदेव कोल्हे यांनी केले. वरोरा येथील लोक शिक्षण संस्थेच्या परिसरात रथसप्तमी च्या निमित्ताने सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन मंगळवार ला करण्यात आले होते, त्या निमित्ताने ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील आणि कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील यांची उपस्थिती होती.
आपल्या प्रतिपादनात कोल्हे यांनी भारतीय संस्कृतीचे दाखले देत सूर्यनमस्कार ही प्राचीन व्यायाम पद्धती आहे असे सांगत या शास्त्रशुद्ध व्यायाम पद्धतीचा आढावा घेतला. शरीर, मन ,बुद्धी ,आत्मा आणि चेतना याचा सर्वांनी सर्वांगीण विचार सूर्यनमस्कारात केला आहे. असे ते म्हणाले. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने योग उपासकांनी सूर्यनमस्कार यज्ञात भाग घेतल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी बोलताना श्रीकृष्णा घड्याळपाटील यांनी देशाच्या सूर्यनमस्कार संकल्पात लोक शिक्षण संस्थेच्या उपसकांनी खारीचा वाटा उचलत 45000 सूर्यनमस्कार घातले. सूर्य उपासनेमुळे बलतेज प्राप्त होत असून सूर्य उपासनेला दैनंदिन जीवनात स्थान मिळाले पाहिजे असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य श्रीकांत पाटील यांनी भारतीय संस्कृती कृतज्ञतेची आहे. सूर्य ऊर्जादाता असून त्याची उपासना घरोघरी नित्य क्रमाने झाली तर तरुण पिढी बलदंड होईल असे ते म्हणाले.
याप्रसंगी हॉलीबॉल आणि बॅडमिंटन खेळात विभाग स्तर ,राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर प्राविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. लोक शिक्षण संस्थेच्या 700 विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सूर्यनमस्कार यज्ञात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी त्रिपुर सुंदरी स्तोत्र, सूर्याष्टकम् आणि रामाष्टकम स्तोत्राचे पठण करून उपस्थितांची मने जिंकली. योग प्रेमींसाठी सदर कार्यक्रम फेसबुक लाईव्ह करण्यात आला होता त्यात अनेक योग साधकांनी याचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्लेषा भट हिने केले. प्रास्ताविक प्रीती दातारकर तर आभार संजीवनी फुलझेले हिने मानले. गायत्री नीखाडे यांनी स्तोत्रांचा अर्थ सांगितला.