गडचिरोली:-सुरजागड लोहखणीतील लोह दगडांच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होण्यासोबतच प्रदूषण आणि वाहतुकीची समस्या वाढत आहे.त्यामुळे ही वाहतूक अधिक सुरक्षितपणे करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी 12 सप्टेंबर पासून आलापल्ली व्यापाऱ्यांनी बेमुदत मार्केट बंद ठेवले आहे.दुसऱ्याही दिवशी 13 सप्टेंबर रोजी आलापल्लीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.विशेष म्हणजे सर्व व्यापाऱ्यांनी या बंद मध्ये संयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे.
आलापल्ली हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने मुलचेरा,एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या चार तालुक्यातील नागरिकांची विविध कामासाठी मोठी गर्दी असते. मात्र,आलापल्ली शहरात व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवल्याने शहरात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यापूर्वीच शासन आणि प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन येथील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने दिले होते.समस्येचे निराकरण न झाल्यास 12 सप्टेंबर पासून आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा इशारा पत्रकार परिषदेतून दिला होता.ठरलेल्या नियोजनानुसार सर्व व्यापाऱ्यांनी संयंस्फूर्तीने या बंद मध्ये सहभाग घेतला आहे.
बायपास रस्ता 3 महिन्यात तयार करावा,बायपास रस्ता तयार होईपर्यंत सुरजागड येथील ट्रक रात्री 10 ते सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवावे.सर्व वाहने क्षमतेनुसार भरावे,एटापल्ली ते आष्टी पर्यंत रस्ता त्यांच्या वाहनांचे लोड सांभाळू शकेल असा मजबुतीकरण तात्काळ करावे या प्रमुख मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी व्यापारी संघटना,अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील,राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता आशिष घोनमोडे तथा सुरजागड लोह खाणीचे अधिकारी यांच्यामध्ये वन विभागाच्या विश्रामगृहात चर्चा झाली.मात्र,कोणताही तोडगा निघाला नाही.त्यामुळे बंद सुरूच ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला.
मार्केट बंदचा आजचा दुसरा दिवस असून तोडगा न निघाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे.मात्र,जोपर्यंत समस्येचे निराकरण होत नाही,तोपर्यंत मार्केट बंद राहणार असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्याने प्रशासन यावर कसा तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.