गडचिरोली:- सुरजागड लोहखाणीतील लोह दगडांच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा होण्यासोबतच प्रदूषण आणि वाहतुकीची समस्या वाढत आहे त्यामुळे ही वाहतूक अधिक सुरक्षितपणे करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी आलापल्ली, नागेपल्ली येथील व्यापारी संघटनेने 12 सप्टेंबर पासून बेमुदत मार्केट बंद केला आहे. व्यापारांच्या या बंदला नागेपल्ली आणि अल्लापल्लीकरांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.
12 सप्टेंबर रोज सोमवार ला सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपापले प्रतिष्ठाने बंद केली. शासन आणि प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन या समस्यावर तोडगा काढण्याची विनंती केल्यावरही या विविध मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचा पवित्रा घेतल्याचे सांगितले आहे. आलापल्ली हे मध्यवर्ती ठिकाण असून मुलचेरा, एटापल्ली,भामरागड, सिरोंचा आणि अहेरी तालुक्यातील नागरिकांना या ठिकाणी आल्याशिवाय पर्याय नाही. गडचिरोली, चंद्रपूर जाण्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आलापल्ली हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र,सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने आलापल्ली येथे आलेल्या नागरिकांची मोठी अडचण झाली.
विशेष म्हणजे पान टपरी पासून तर औषधांची दुकानेही बंद होती. व्यापारांच्या या बंदला अहेरीकरांनीही पाठिंबा दर्शवित आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती.आलापल्ली येथे सकाळपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त आढळून आला. अहेरी पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार पंकज बोंडसे आपल्या चमुसोबत उपस्थित राहून कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली.
——————————————–
या आहेत प्रमुख मागण्या
१) बायपास रस्ता तीन महिन्यात तयार करावा.
२) बायपास रस्ता तयार होईपर्यंत सुरजागड येथील ट्रक रात्री दहा ते सकाळी पाच पर्यंतच सुरू ठेवावे.
३) सर्व गाड्या क्षमतेनुसार भरावे.
४) एटापल्ली ते आष्टी पर्यंत रस्ता त्यांच्या गाड्यांचे लोड सांभाळू शकेल असा मजबुतीकरण तात्काळ करावे.
——————————————–
तीन तास चर्चेनंतरही तोडगा नाहीच
आलापल्ली आणि नागेपल्ली येथील व्यापारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संप आणि त्यांच्या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी अपर जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अहेरीचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड आणि राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता आशिष घोनमोडे तसेच त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीचे काही पदाधिकारी आलापल्ली येथील वनविभागाच्या विश्रामगृहात उपस्थित झाले.यावेळी आलापल्ली आणि अहेरी येथील व्यापारी संघटनेशी या ४ मागण्यांवर त्यांनी जवळपास तीन तास चर्चा केली. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही.
—————————————–
व्यापारी बेमुदत संपावर ठाम
आमच्या समस्यांवर आलापल्ली येथील वनविभागाच्या विश्रामगृहात जवळपास तीन तास चर्चा करण्यात आली.मात्र, या चर्चेदरम्यान कुठलाही तोडगा न निघाल्याने आम्ही बेमुदत संपावर ठाम आहोत.
-चंद्र किशोर पांडे अध्यक्ष,व्यापारी संघटना आलापल्ली