चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, आज( १२ ऑगस्ट )बिंनबा गेट परिसरातील शाही दरबार हॉटेलमध्ये कुख्यात गुंड हाजी सरवर अली याची सात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हाजी अलीची हत्या चंद्रपूरमधील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ माजवणारी घटना ठरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, घुग्घुस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर अली, ज्याची काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटका झाली होती, तो बिंनबा गेट जवळील शाही दरबार हॉटेलमध्ये जेवण करत असताना सात अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. हाजी अलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून बंदुकीने त्याच्यावर वार केले. गंभीर अवस्थेत हाजी अली याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हाजी अलीची पार्श्वभूमी गुन्हेगारीशी जोडलेली असून, तो अवैध कोळसा व्यापारात सक्रिय होता. त्याचा चंद्रपूर जिल्ह्यात मोठा दरारा होता. हाजी अलीची हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे, आणि या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी नाकाबंदी केली आहे. हाजी अलीच्या हत्येमुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जात आहे.
पोलीस प्रशासनाने शहरात सुरक्षेची तयारी वाढवली असून, या घटनेमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास जलदगतीने सुरू आहे. हाजी अलीच्या हत्येने चंद्रपूर शहरातील गुन्हेगारी विश्वात एक नवा अध्याय उघडला असल्याचे मानले जात आहे.