वरोरा : वरोरा -चिमूर मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरु असून अनेक ठिकाणी सदोष कामे केल्यामुळे याचा फटका रोडलगतच्या शेतकऱ्यांना बसत आहे. गेले दहा दिवस परिसरात संततधार पाऊस होता पण कंपनी प्रशासनाच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पाण्याचा मार्ग बंद झाल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेले . यात मौजा खैरगाव येथील अतुल नन्नावरे यांच्या शेतात कुकुट पालन प्रकल्प आहे त्या शेडमध्ये पाणी गेल्याने चार लाखाचे नुकसान झाले.वारंवार मदतीची मागणी करूनही कुणालाच न जुमानणाऱ्या अडेलतट्टू व्यवस्थापकाचा आज कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती राजू चिकटे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रकल्प कार्यालयात जाऊन व्यवस्थापकाचा समाचार घेत कार्यालयात डांबले.
अतुल नन्नावरे या युवकाचे शेत चिमूर वरोरा मार्गालगत मौजा खैरगाव येथे आहे. मागील काही वर्षापासून शेतीला जोडधंदा म्हणून कुकुट पालन व्यवसाय सुरू केला. अतुल नन्नावरे यांच्या शेता नजीक एस आर के कंपनीच्या वतीने पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मागील दहा दिवसात मुसळधार पाऊस आला कंपनी ने पाणी जाण्याचे कुठले नियोजन केले नाही त्यामुळे पाच ते सहा फूट उंचीपर्यंत पाणी गोळा होऊन अतुल नन्नावरे यांच्या कुक्कुटपालन शेडमध्ये गेले. पाणी अधिक असल्याने शेडमध्ये जाता आले नाही त्या पाण्याने पूर्ण कोंबड्या मृत पावल्यात्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला त्या पंचनाम्यात पुलाचे बांधकाम करणारी कंपनी दोषी असल्याचे नमूद केले आहे. याबाबत वरोरा तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले .कंपनीकडे नुकसान भरपाईची वारंवार मागणी करून कंपनी व्यवस्थापन टाळाटाळ करीत होते अखेरीस 21 जुलै रोजी वरोरा चिमूर मार्गालगत भेंडाळा गावात असलेल्या कंपनी कार्यालयात शेतकरी धडकले व व्यवस्थापक आत मध्ये बसून असताना त्याच्या कक्षाला बाहेरून कुलूप लावले यावेळी जिल्हा सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र चिकटे, योगेश खामनकर ,अनिल पावडे ,अतुल नन्नावरे, प्रवीण बदकी, रवी देसाई, राहुल नन्नावरे ,नवोदय धोबे, तुषार कडू,विकी वानखेडे ,अक्षय पांडे, विशाल मुंगले, शुभम मोरे आदी उपस्थित होते.