*मूल, – मूल उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निधीतून उपलब्ध करून दिलेली रुग्णवाहिका वापरात नसल्याने धूळ खात पडली आहे. नगरपरिषद आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्यात समन्वयाअभावी ही महत्त्वाची सेवा जनतेला मिळू शकत नाही, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज (23 सप्टेंबर )नगरपरिषद मुख्याधिकारी संदीप दोडे यांना निवेदन देऊन रुग्णवाहिका तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. ज्या रुग्णांना अधिक गंभीर उपचारांसाठी चंद्रपूरला पाठविणे आवश्यक असते, त्यांच्यासाठी शासनाची १०८ सेवा उपलब्ध आहे. मात्र, ती अपुरी पडत असून, रुग्णांच्या नातेवाईकांना खासगी रुग्णवाहिका भाड्याने घ्यावी लागत आहे. हे सर्वसामान्य कुटुंबांवर मोठे आर्थिक ओझे बनले आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतःच्या आमदार निधीतून उपजिल्हा रुग्णालयाला नगरपरिषद मार्फत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, पण प्रशासनातील चालढकलपणामुळे ती वापरात आणली जात नाही. रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हर आणि देखभाल खर्च कोण उचलणार, यावर दोन्ही यंत्रणांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे लाखो रुपयांची रुग्णवाहिका धूळ खात आहे.
या गंभीर स्थितीवर आकाश येसनकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रुग्णवाहिका तात्काळ जनतेच्या सेवेत उपलब्ध न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला आहे. आजच्या निवेदनप्रसंगी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष रोहित कामडे, आदित्य गेडाम, रितिक शेंडे, गोलु दहिवले, शुभम निमगडे, यश लेनगुरे, पिंपळे, सुमित बोरकुंटावार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
रुग्णवाहिका तात्काळ सुरु करून जनतेसाठी महत्त्वाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी सर्वत्र जोर धरत आहे.