अहेरी:येथील प्रकल्प अधिकारी आदित्य जीवने (भाप्रसे) यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांच्या ठिकाणी कुशल जैन (भाप्रसे) यांनी नुकतेच प्रकल्प अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
कुशल जैन हे मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथील असून ते मायक्रोसॉफ्ट इंजिनियर देखील आहेत.त्यांनी २०२१ मध्ये यूपीएससी परीक्षा पास करून संपूर्ण देशातून ४० वा रँक प्राप्त केला होता.नागपूर जिल्ह्यात त्यांनी पर्यवीक्षादिन कालावधी पूर्ण केला. नरखेड, पारशिवणी,वानाडोंगरी आदी ठिकाणी त्यांनी प्रशासकीय कामाचा अनुभव घेतला.
सामान्य प्रशासन विभागाने २३ सप्टेंबर रोजी प्रकल्प अधिकारी आदित्य जीवने (भाप्रसे) यांचे बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीचे आदेश निर्गमित केले.२५ सप्टेंबर रोजी आदित्य जीवने यांनी पदभार सोडला. त्यांच्या ठिकाणी कुशल जैन (भाप्रसे) यांनी नुकतेच अहेरी प्रकल्प अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
त्यांनी पदभार स्वीकारताच प्रकल्प कार्यालय,उपविभागीय कार्यालय येथील अधिकारी,कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यानंतर त्यांनी दोन्ही विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करत सर्वांचा परिचय घेतला.
विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान
विधानसभा निवडणुक तोंडावर असताना कुशल जैन यांची प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.सोबतच त्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारीचे पदभार देखील सांभाळायचे आहे.त्यामुळे अतिदुर्गम, नक्षलग्रस्त व आदिवसीबहुल म्हणून ओळख असलेल्या (६९-अहेरी विधानसभा मतदार संघ) विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांच्यापुढे आव्हान राहणार आहे.