*मूल प्रतिनिधी*
मूल तालुक्यातील काटवन जंगलातील कक्ष क्र. 756 मध्ये गुराखी देवाजी वारलु राऊत (50) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी 4.30 वाजता घडली, जेव्हा देवाजी राऊत आपल्या शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
घटनास्थळी वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र अधिकारी गजानन वरगंटीवार आणि वनरक्षकांनी पाहणी केली. वाघ नरभक्षी आहे किंवा बिबट आहे, याचा शोध घेण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले असल्याची माहिती कारेकर यांनी दिली.
मृतकाच्या कुटुंबाला 20 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. देवाजी राऊत यांच्या पश्चात पत्नी आणि मूल आहेत. काटवन परिसरात यापूर्वीही वाघाच्या हल्ल्यांमध्ये तीन ते चार जणांचे प्राण गेले आहेत, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेडचे राकेश मोहुर्ले यांनी केली आहे.