वणी : समाजात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. लाखो युवक नोकरीच्या शोधात शहरात येत आहे. परंतु शेतीवर आधारित नवनवीन उद्योग निर्माण झाले आहे. आय. टी कंपनीतील युवक देखील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून उद्योग उभारत आहे. त्याच प्रकारे या भागातील युवकांनी देखील उद्योग उभारून रोजगार मागणारे नाही तर रोजगार देणारे युवक बना असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
वणी येथे आज जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ तर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी शरद जवळे, यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, संजय देरकर, विद्याताई शितोळे, प्रसाद खानझोडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, युवकांनी पारंपरिक शिक्षण न घेता रोजगार निर्मितीचे शिक्षण घेतले पाहिजे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून शासन मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्राचे शिक्षण देत आहे. येत्या काळात कौशल्य विकास हेच शिक्षण युवकांना नव्या संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे भविष्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी हेच शिक्षण घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते मांडली.यावेळी या रोजगार व मार्गदर्शन मेळाव्याला विविध कंपन्यांचे अधिकारी तसेच बेरोजगार युवकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.













