राजुरा (सागर भटपल्लीवार ):-सध्या शहरात आभासी चलनाची मोठी चर्चा सुरू आहे.रुपयांच्या बदल्यात डॉलरचे चलन मिळविण्यासाठी अनेकांनी लाखोंची गुंतवणूक केली आहे.काही गुंतवणूकदारांनी अधिकच्या लोभापोटी डॉलरचे विड्रॉल न करता ‘रिवाय’ मारला आहे.पण मागील काही महिन्यांपासून विड्रॉलचा घोळ सुरू असल्याने अनेक गुंतवणूकदारांना घाम फुटला आहे.दरम्यान या आभासी चलनासाठी काही व्यापारी व नेत्यांनी ‘रिस्क’ घेऊन गुंतवणूक केल्याची माहिती आहे पण सध्या तरी त्यांनी तोंड बंद ठेवले आहे.
.शहरात आभासी चलन मिळविण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे.यातून मोठा लाभ मिळत असल्याने अनेकांनी गुंतवणूक केली आहे. सुरुवातीला ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना ‘छप्पर फाड’ पैसा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे अनेक धनदांडग्यांनी यात उडी घेतली आहे. पण सध्या डॉलर जमा होऊन सुध्दा विड्रॉलचा घोळ सुरू असल्याने गुंतवणूकदारांची पोटदुखी वाढली आहे.मुळात यात गुंतवणूक करण्यासाठी ‘आयडी’ उघडावी लागते.या चलन प्राप्तीसाठी मोठी ‘रिस्क’ असल्याचे सांगण्यात येत आहे.तरी देखील काही व्यापारी व नेते आभासी चलनाच्या ‘मोह’ जाळ्यात फसले आहे.सुरुवातीला विड्रॉल नियमित होत होते.त्यामुळे अनेकांनी गुंतवणूकीची मूळ रक्कम काढल्याचे सांगण्यात येत आहे.पण काही गुंतवणूकदारांनी जोखीम पत्करून जास्तीचा लाभ मिळावा याकरीता ‘रिवाय’ मारला आहे.सध्या हाच ‘लोभ’ विड्रॉलच्या घोळामुळे गुंतवणूकदारांच्या मानगुटीवर बसला आहे. सुरुवातीला काही क्षणात विड्रॉलचे पैसे खात्यात जमा होत होते.पण मागील काही महिन्यांपासून विड्रॉलच ‘पेंडिंग’ दाखवत असल्याने अनेकांची धाकधुकी वाढली आहे.त्यातच आता डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली आहे.केंद्राने सुध्दा नफ्यावर ३० टक्के कर आकारल्याचे समजते.या आभासी चलनाच्या गुंतवणूकीतून धनप्राप्ती होईल अशी आशा बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांना सध्या तरी चलनाचा निव्वळ आ’भास’ होत आहे.













