गडचिरोली:- मागील दोन दिवसापासून भामरागड तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातला असून आल्लापल्ली ते भामरागड रस्त्यावरील लोकबिरादरी प्रकल्प जवळ असलेल्या कुमरगुंडा नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने या मार्गावरची रहदारी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
पावसाळ्यात दरवर्षी जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला सर्वात अगोदर फटका बसतो. तालुका मुख्यालयात पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती या तीन नद्या आहेत. छत्तीसगड राज्यात जरी मुसळधार पाऊस झाल्यास या नद्यांना पूर येतो.या नद्यांची पाण्याची पातळी लवकरच वाढते. दरवर्षीच जुलै महिन्यात भामरागड तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटत असतो. यंदा अजून पर्यंत भामरागड तालुक्याचा संपर्क जरी तुटला नसले तरी, दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. आलापल्ली ते भामरागड रस्त्यावर असलेल्या पर्लकोटा,बांडे नदी व्यतिरिक्त अनेक छोटे छोटे नाले आहेत. या नाल्यावर रपटे असून रपट्यावर पाणी वाहत आहे.कुमरगुंडा नाल्यावरील सदर रपटा वाहून गेल्याने मध्यरात्रीपासून हा मार्ग अक्षरशा बंद झाला आहे.
गडचिरोली ते लाहेरी ही बस लाहेरीला मुक्कामाने असते. आज सकाळी लाहेरी वरून गडचिरोली साठी निघालेली ही बस नाल्याच्या त्या पलीकडेच अडकल्याने प्रवाशांना नाहकत्रास सहन करावा लागत आहे. सोबतच अनेक खाजगी वाहने सुद्धा अडकली आहे. आलापल्ली पासून जवळपास 65 किलोमीटर अंतरावर असलेल्या भामरागड तालुक्यात पर्ल कोटा आणि बांडे नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू असले तरी ती काम अजून पर्यंत पूर्ण झाले नाही. त्यामुळे याहीवर्षी भामरागड तालुक्याला पुराचा फटका बसणार असून रहदारी ठप्प होणार आहे. सध्या स्थितीत मोठ्या नद्यांचा धोखा नसले तरी या रस्त्यावरील छोट्या रपट्यामुळे रहदारीस अडचण निर्माण झाली आहे.सध्याच्या स्थितीत भामरागड तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी रस्त्यावरील रपटे वाहून गेल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
*ऐन पावसाळ्यात कामाला सुरुवात*
आलापल्ली ते भामरागड रस्त्यावरील छोट्या नाल्यावर सुद्धा पुलाचे काम मंजूर झाले आहे.संबंधित कंत्राटदाराने उन्हाळ्यात काम सुरू न करता चक्क पावसाळ्यात काम सुरू केले आहे. वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात रपटे तयार केले आहे.मुसळधार पावसाने तात्पुरत्या स्वरूपात बनविलेले रपटे वाहून जात असल्याचे दृश्य दिसून येत आहे.













