आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांचा संयुक्त उपक्रम
जवळपास ७०० नागरिकांनी घेतला लाभ
वरोरा (प्रतिनिधी) :
आरोग्य शिबिरे ही ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब जनता व शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी उपयोगी पडत असते. अशा शिबिरांमुळे समाजातील दातृत्व जिवंत असल्याची प्रचिती येते. स्वच्छ हवा, शुध्द पाणी, विषमुक्त आहार, व्यायाम, व चांगले विचार यातून आरोग्य सुदृढ ठेवा म्हणजे अशा शिबिरांची आवश्यकता पडणार नाही, असे मत महारोगी सेवा समिती, आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियानांतर्गत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) आणि स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांचा संयुक्त विद्यमाने तालुक्यातील खांबाडा येथे जि.प. प्राथमिक शाळेत आज (दि.२३) रोज शनिवारला भव्य सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खांबाडा परिसरातील जवळपास ७०० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराचे उदघाटन वरोरा येथील महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी खांबाडा येथील जेष्ठ वैदयकीय चिकीस्तक डॉ. मोरेश्वर राऊत होते. यांच्यासह खांबाडा ग्रामपंचायत चे सरपंच प्रकाश शेळकी, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक रविंद्र शिंदे, मार्गदर्शक धनराज कान्होबाजी आस्वले, पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ताभाऊ बोरेकर, नामदेवराव जोगे, विठ्ठलराव पोंगडे, सुधाकर बुऱ्हाण, प्रमोद वाघ, देवीदासपंत धोटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाबा आमटे यांनी स्वतः जगलेले समाजसेवेचे व्रत वारसा म्हणून प्रत्येकाने पुढे चालवावे. बाबा आमटे यांच्या कार्यातून प्रेरणा घेवूनच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरचे कार्य सुरु आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब पालक व कोरोणा प्रादुर्भावाने मृत झालेल्या पालकांच्या पाल्यांचे विवाह जुळले असेल व आर्थिक कारणांमुळे जर त्यांच्या विवाहात बाधा येत असेल तर अशा पाल्यांचा विवाह ट्रस्ट तर्फे करण्यात येईल, त्यासाठी नोंदणी अभियान सुरू आहे, असे रवि शिंदे यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले.
यापूर्वी भद्रावती तालुक्यातील कोंढा या गावात सदर सर्व रोग निदान व उपचार शिबिर आनंदवनचे विकास आमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आले होते. त्यात जवळपास ६१० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला होता व त्यानंतर अनेक रुग्ण सावंगी येथील रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. त्याच शिबिराची पुनरावृत्ती खांबाला येथे घडून आल्याचे निदर्शनास आले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वसंत पडवे, शिक्षकवृंद, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण भोयर, प्रमोद देवतळे, युवराज इंगळे, प्रमोद चौधरी, अनिल ढोबळे, दादाराव वैद्य, जनार्धन राऊत, तन्मय देवतळे, शारदा गणेश मेश्राम, श्रुती सुभाष बावणे, पायल नामदेव विरुतकर, पल्लवी ठेंगणे, रिंकू मारोती दाते, सोनम संतोष किन्नाके, व गावातील नागरिकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अशोक टिपले यांनी केले.