इंदापूर,: पुणे शहरातील विश्रांतवाडी-येरवडा परिसरात नाभिक समाजातील ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ इंदापूर येथे गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन प्रकरणाचा जलदगतीने तपास करावा आणि दोषी आढळणाऱ्याविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील सर्व दुकाने गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांनीही आपली दुकाने बंद ठेवून या निषेध आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पश्चिम युवक अध्यक्ष रमेश राऊत, इंदापूर तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष अवधूत पवार आणि इंदापूर नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी या मूक मोर्चात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पुणे येथील घटनेमुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास संवेदनशीलतेने आणि वेगाने करण्यात यावा, तसेच पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
मूक मोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदविण्यासोबतच अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही अधोरेखित करण्यात येणार आहे. कायद्याच्या चौकटीत दोषींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळावा, अशी भूमिका नाभिक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.













