गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारूची वाहतूक आणि विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. एटापल्ली पोलिसांनी जीवनगट्टा ते बारसेवाडा मार्गावर सापळा रचून अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई केली. या कारवाईत दोन स्कॉर्पिओ वाहनांसह दारू आणि सात मोबाईल असा एकूण २७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
२९ ऑक्टोबर रोजी एटापल्ली पोलीस पथक रात्रगस्तीवर असताना जीवनगट्टा येथे दोन संशयित वाहनांतून देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जीवनगट्टा ते बारसेवाडा मार्गावर सापळा रचला. यावेळी पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून काळ्या स्कॉर्पिओमध्ये दारूच्या पेट्या भरल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी वाहनांसह पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी दोन्ही वाहने घेरून सहा जणांना ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेत काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली असता, एकूण ६० पेट्या देशी दारू आणल्याचे समोर आले. त्यापैकी २९ पेट्या जीवनगट्टा येथील संतोष नरोटे याच्या घरी उतरविल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घरझडती घेतली. यामध्ये रॉकेट संत्री देशी दारूचे २२ बॉक्स आणि प्रीमियम क्रमांक १ कोकण देशी दारूचे १८ बॉक्स जप्त करण्यात आले.
या कारवाईत आठ लाख रुपये किमतीची पांढरी स्कॉर्पिओ, १५ लाख रुपये किमतीची काळी स्कॉर्पिओ, चार लाख रुपये किमतीची ४० पेट्या देशी दारू आणि ७० हजार रुपये किमतीचे सात मोबाईल असा एकूण २७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी एकूण नऊ जणांविरुद्ध एटापल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून संतोष नरोटे, गौरव प्रभाकर माकोडे आणि मिथुन निर्मल मलिक या तिघांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट व पोलीस पथकाने ही कारवाई केली.













