गडचिरोली: जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे चित्र एटापल्ली तालुक्यातील डुम्मे येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाहणीत समोर आले. शाळेतील स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर संपल्याने विद्यार्थ्यांसाठीचे जेवण चक्क चुलीवर बनवावे लागत आहे. चुलीच्या धुरामुळे स्वयंपाक करणाऱ्या ताईंना मोठा त्रास सहन करावा लागत असून, डोळ्यांतून पाणी येत असतानाही विद्यार्थ्यांचे जेवण बनवण्याची जबाबदारी त्या पार पाडत आहेत.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके गुरुवारपासून दोन दिवसीय गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर असून, पहिल्याच दिवशी त्यांनी एटापल्ली तालुक्यातील विविध शाळांना भेटी देत प्रत्यक्ष पाहणी केली. याच दौऱ्यात त्यांनी डुम्मे येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता, शाळेच्या स्वयंपाकगृहात गॅस उपलब्ध नसल्याने चुलीवर स्वयंपाक सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.चुलीवर स्वयंपाक करताना निर्माण होणारा धूर, डोळ्यांची होणारी जळजळ आणि श्वास घेताना जाणवणारा त्रास यामुळे स्वयंपाकी ताईंना रोज मोठी कसरत करावी लागत असल्याचे यावेळी समोर आले. दुपारच्या जेवणासाठी विद्यार्थ्यांचे अन्न तयार करण्याची जबाबदारी असलेल्या या महिलांना मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने धुरात काम करण्याची वेळ का येत आहे, असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.
अभिजीत दिपके यांनी स्वयंपाक करणाऱ्या ताईंशी संवाद साधून त्यांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याची माहिती घेतली.विद्यार्थ्यांसाठी भोजन बनवणाऱ्या ताईंच्या डोळ्यांत धुराचे पाणी, मात्र या परिस्थितीमागचा प्रश्न व्यवस्थेचा असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
दिपके यांच्या एटापल्ली तालुक्यातील पाहणीदरम्यान केवळ स्वयंपाकगृहातील गॅसच नव्हे, तर शाळांमधील इतर मूलभूत सुविधांचाही प्रश्न समोर आला. काही ठिकाणी जर्जर शाळा इमारती, अस्वच्छता, मुलींसाठी बांधण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या शौचालयाला दार नसणे, तसेच विद्यार्थ्यांना वाघाच्या दहशतीत दोन ते तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागत असल्याच्या समस्या त्यांच्या निदर्शनास आल्या.काही शाळांमध्ये त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून शाळांच्या दुरुस्तीबाबत आणि आवश्यक सुविधांबाबत चर्चा केली. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच सुरक्षित इमारत, स्वच्छतागृह, स्वच्छ वातावरण आणि स्वयंपाकासाठी आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे असल्याचा मुद्दा या पाहणीमुळे अधोरेखित झाला आहे.
दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या गडचिरोली दौऱ्याला विविध ठिकाणी प्रतिसाद मिळत असून, गडचिरोलीपासून एटापल्लीपर्यंत त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेषतः तरुणांकडून त्यांना भेटण्यासाठी गर्दी होत असल्याचे दिसून आले. शुक्रवारी त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून ते भामरागड तालुक्यातील शाळांना भेटी देऊन नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.













