गडचिरोली: जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत 32 गोवंशीय जनावरांसह दोन चारचाकी वाहने आणि तीन मोबाईल असा तब्बल 19 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून, तीन आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसाय तसेच गोवंशाची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखा आणि आरमोरी पोलिसांनी 28 ऑगस्टच्या रात्री आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धडक कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री गस्त घालत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही जण आयसर वाहनातून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी ठाणेगाव-आरमोरी टी-पॉईंट परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित आयसर वाहनासोबत दोन वाहने पायलटिंग करताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी आयसर वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये जनावरे अत्यंत निर्दयपणे कोंबून भरल्याचे आढळून आले.
वाहनातील दोघांनी जंगलाच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून प्रणय समीर जांभुळकर (वय 20, रा. आंधळी, ता. कुरखेडा) याला ताब्यात घेतले.
दरम्यान, पुढे तैनात असलेल्या आरमोरी पोलिसांनी काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता पळ काढला.
त्यानंतर मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर वाहनाला पोलिसांनी अडवले. वाहनातील तिघांनीही जंगलाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी शिताफीने तिघांनाही ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये शेहबाज सलाम शेख (31), शोहेब फारुक शेख (27) आणि शेख आकिब नासीर शेख यांचा समावेश आहे.26 गायी, 6 बैल; सहा जनावरे मृत पंचांसमक्ष वाहनांची तपासणी केली असता आयसर वाहनामध्ये 26 गायी आणि 6 बैल, अशी एकूण 32 जनावरे आढळून आली. या जनावरांची अंदाजे किंमत 5 लाख 95 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वैद्यकीय तपासणीत 32 पैकी 4 गायी आणि 2 बैल अशी एकूण 6 जनावरे मृत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी यासोबतच अंदाजे 10 लाख रुपये किमतीचे आयसर वाहन, 3 लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर आणि तीन मोबाईल फोन असा एकूण 19 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी शेहबाज सलाम शेख, शोहेब फारुक शेख, शेख आकिब नासीर शेख आणि प्रणय समीर जांभुळकर या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर शहजाद शेख, जमील कुरेशी आणि आयसर वाहनाचा अज्ञात चालक यांचा शोध सुरू आहे.आरमोरी पोलीस ठाण्यात अप. क्र. 380/2026 अन्वये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोउपनि. गणेश कांबळे, पोलीस स्टेशन आरमोरी करीत आहेत.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अरुण फेगडे आणि आरमोरीचे पोनि. सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.













