गडचिरोली: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आज, ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.
प्रारूप मतदार यादीनुसार जिल्ह्यात ३ लाख ७२ हजार ८७८ पुरुष, ३ लाख ६५ हजार ४११ महिला आणि १२ तृतीयपंथी, असे एकूण ७ लाख ३८ हजार ३०१ मतदार आहेत. याशिवाय अनुपस्थित, स्थलांतरित, मृत अथवा अन्य कारणांमुळे वर्गीकृत केलेल्या मतदारांची संख्या ९० हजार ६१६ आहे.
२७ हजारांहून अधिक मतदारांची जुळवणी नाही
विशेष पुनरीक्षणादरम्यान जिल्ह्यात २७ हजार ४१४ ‘अनमॅप्ड’ मतदार आढळले असून, ५६ हजार ८५२ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळून आली आहे. संबंधित मतदारांना आपली बाजू मांडण्यासाठी सुनावणीची संधी दिली जाणार आहे.यासाठी ECI NET पोर्टलवरून संबंधित मतदारांसाठी नोटीस ऑटो जनरेट होणार असून, मतदार नोंदणी अधिकारी त्यामध्ये सुनावणीची तारीख व ठिकाण नमूद करून संबंधितांना नोटीस उपलब्ध करून देतील. मतदारांची मतदान केंद्रनिहाय संख्या लक्षात घेऊन शहरी तसेच ग्रामीण भागात सुनावणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.
९७३ मतदान केंद्रांवर प्रारूप यादी उपलब्ध
प्रारूप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालये देसाईगंज, गडचिरोली आणि अहेरी, सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालये, जिल्ह्यातील ९७३ मतदान केंद्रे तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, संपर्क होऊ न शकलेल्या मतदारांची अद्ययावत यादीही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली.
ज्या मतदारांना सुनावणीसाठी नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी निर्धारित तारीख व ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.













