कुरखेडा : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या मार्गाने सुरू असलेल्या दारू वाहतुकीवर कुरखेडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वडसा-कुरखेडा मार्गावर सापळा रचून पोलिसांनी देशी-विदेशी दारूसह एक चारचाकी वाहन असा तब्बल 2 लाख 77 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 27 ऑगस्ट रोजी रात्री वडसा-कुरखेडा मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयास्पद पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी रिट्झ कारला अडवून तपासणी केली असता, वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी दारू आढळून आली.
कारवाईत ‘संत्री’ देशी दारूचे 20 बॉक्स म्हणजेच 2 हजार नग, रॉयल स्टॅग विदेशी दारूचे 96 नग आणि सह्याद्री गोल्डचे 48 नग असा दारूसाठा जप्त करण्यात आला. जप्त दारूची किंमत 1 लाख 77 हजार 600 रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे.पोलिसांच्या चौकशीत हा दारूसाठा मोहन लांजेवार, रा. केशोरी, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया याचा असल्याचे समोर आले. या प्रकरणी सौरभ संतोष डहाळे आणि मोहन लांजेवार यांच्याविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.













