अहेरी : रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त ९व्या बटालियन सीआरपीएफच्या प्राणहिता कॅम्पमध्ये बंधुप्रेम, स्नेह आणि विश्वासाचा संदेश देत रक्षाबंधन उत्साहात साजरे करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संस्थांशी संबंधित महिलांनी सीआरपीएफ जवानांना राखी बांधून त्यांच्या सुखी, निरोगी आणि सुरक्षित आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लोकमत सखी मंच, हेल्पिंग हँड ग्रुप, रोल एनजीओ, भारतीय जनता पार्टी सखी मंच आणि शिवसेना ग्रुपशी संबंधित महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या. महिलांनी जवानांच्या मनगटावर राखी बांधत देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जवानांनीही उपस्थित भगिनींप्रति आदर आणि स्नेह व्यक्त करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ९व्या बटालियन सीआरपीएफचे द्वितीय कमांडिंग ऑफिसर (प्रशासन) सत्यनारायण मीना आणि द्वितीय कमांडिंग ऑफिसर (ऑपरेशन्स) योगेंद्र आनंद राव डाखोले यांनी ९व्या बटालियन परिवाराच्या वतीने उपस्थित अधिकारी, महिला आणि जवानांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.रक्षाबंधन हा प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या पवित्र बंधनाचा सण असून, अशा उपक्रमांमुळे सीआरपीएफ आणि स्थानिक नागरिकांमधील परस्पर विश्वास, सहकार्य व बंधुभाव अधिक दृढ होतो, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमातून बंधुभाव, सामाजिक सलोखा, महिलांचा सन्मान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला. जवान आणि स्थानिक महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे प्राणहिता कॅम्पमध्ये रक्षाबंधनाचा सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला.













