गडचिरोली: जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण, उच्च शिक्षण आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महास्ट्राईड’ उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन आणि एचसीएलटेक ट्रेनिंग अँड स्टाफिंग सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यात ‘टेकबी’ कार्यक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्रात जिल्हास्तरावर अशा स्वरूपाचा करार करणारा गडचिरोली हा पहिला जिल्हा ठरला आहे.
सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि एचसीएलटेकच्या प्रतिनिधींमध्ये हा करार झाला.
ग्रामीण, दुर्गम व आदिवासी भागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत ही संधी पोहोचवावी, असे आवाहन सहपालकमंत्र्यांनी केले.
‘टेकबी’ अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सुमारे १२ महिन्यांचे वर्ग प्रशिक्षण व प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना एचसीएलटेकमध्ये पूर्णवेळ रोजगाराची संधी मिळू शकते. यासाठी सुमारे अडीच लाख रुपयांच्या वार्षिक वेतनापासून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली.
यासोबतच विद्यार्थ्यांना आयआयटी गुवाहाटी, बिट्स पिलानी, आयआयआयटी कोट्टायम आणि आयआयएम सिरमौर यांसारख्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधीही मिळणार आहे.
जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचवून पात्र विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या. ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्य, उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगाराशी जोडण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.













