मुलचेरा : मुलचेरा पोलीस ठाण्यात नवीन ठाणेदार रुजू होताच अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाईची सुरुवात केली आहे. १३ ऑगस्ट रोजी गोमणी येथे एकाच वेळी केलेल्या कारवाईत दोन ठिकाणांहून देशी-विदेशी दारूसह एकूण ६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोमणी गावातील दोन घरांची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. यावेळी सत्यनारायण बालय्या गड्डमवार याच्या घरातून देशी संत्रा दारूच्या २६ निपा आणि ६ बिअर कॅन, असा ३ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर लक्ष्मी गोपीनाथ वैष्णव हिच्या घरातून देशी संत्रा दारूच्या ४४ निपा आणि २ बिअर कॅन, असा ३ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.या दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम ६५(ई) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नवीन ठाणेदार रुजू होताच झालेल्या या कारवाईमुळे मुलचेरा तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मुलचेरा परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी यापुढेही पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नवीन ठाणेदारांच्या या पहिल्याच कारवाईनंतर आता मुलचेरातील अवैध दारूविक्रीला खरंच आळा बसणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.













