गडचिरोली: गडचिरोलीच्या समृद्ध झाडीबोली, माडिया-गोंडी भाषा, साहित्य आणि लोककलेला आता शासनाचे संस्थात्मक पाठबळ मिळणार आहे. जिल्ह्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा विकास व संशोधन केंद्र’ उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी गुरुवारी केली. तसेच झाडीबोली संमेलनासाठी दरवर्षी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मराठी भाषा विभागाचा आढावा घेतल्यानंतर साहित्यिक, लेखक, कवी, नाट्यकर्मी आणि बोलीभाषा अभ्यासकांशी संवाद साधताना डॉ. सामंत बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह साहित्यिक व कलावंत उपस्थित होते.
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग
साहित्यिक आणि कलावंतांच्या समस्या जिल्हास्तरावरच सोडविण्यासाठी पुढील महिन्यापासून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा विभाग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी आणि आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
झाडीबोलीसह स्थानिक बोलींना व्यासपीठ
झाडीबोलीसह विविध स्थानिक बोलीभाषांमध्ये निर्माण होणाऱ्या साहित्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे. बोलीभाषांची शब्दसंपदा जतन करण्यासाठी व्यापक बोलीभाषा शब्दकोश तयार करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.स्थानिक साहित्य महाराष्ट्राबाहेर आणि देश-विदेशातील वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी मराठी साहित्याच्या हिंदी, इंग्रजी, कन्नड, जपानीसह विविध भाषांमध्ये अनुवादाला शासन आर्थिक पाठबळ देणार असल्याचेही डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
कलावंत संकुल, नाट्यगृहाच्या मागणीवर सकारात्मक कार्यवाही
गडचिरोलीच्या झाडीपट्टी नाट्यपरंपरेला अधिक बळ देण्यासाठी कलावंत संकुल आणि शासकीय नाट्यगृह उभारण्याच्या मागणीवर सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन डॉ. सामंत यांनी दिले.
माडिया-गोंडी भाषांच्या संवर्धनासाठी ‘एआय’चा वापर
माडिया आणि गोंडी भाषांचे दस्तऐवजीकरण, व्याकरणाची रचना आणि संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोलीच्या झाडीबोली, माडिया, गोंडी आणि अन्य स्थानिक भाषांचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन साहित्यिक, संशोधक आणि कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही डॉ. उदय सामंत यांनी दिली.













