गडचिरोली : समाजात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या एकल महिलांना यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सन्मानाचे स्थान देण्याचा अभिनव निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमात विधवा, परित्यक्ता आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या एकल महिलांच्या हस्ते तिरंगा फडकविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे गावातील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळणार आहे. एकल महिलांना केवळ सहानुभूती नव्हे, तर समाजात सन्मानाचे स्थान देण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने याबाबत सर्व पंचायत समित्यांना सूचना दिल्या असून, ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर अशा महिलांची निवड करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तिरंगा फडकविण्याचा मान मिळाल्याने एकल महिलांच्या सामाजिक सन्मानात निश्चितच भर पडणार असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.













