भामरागड :- मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील भारत पेट्रोलियमचा एकमेव पेट्रोल पंपात पाणी गेल्याने 128 गावांमध्ये खळबळ उडाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यासाठी 29 जुलै रोजी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी विशेष अधिकार वापरून संपूर्ण जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती.अंदाजानुसार काही तासातच भामरागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. पुराच्या पाण्याची पातळी इतकी वाढली की जवळपास संपूर्ण भामरागड पाण्याखाली गेला. याच पुराच्या तडाख्यात हेमलकसा येथील तालुक्यातील एकमेव पेट्रोल पंपात पाणी शिरले.सध्या खरीप हंगाम आणि भातरोवणीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टरसाठी डिझेलची मागणी मोठी आहे. मात्र एकमेव पेट्रोल पंप बंद झाल्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.पेट्रोल पंपात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तालुक्यातील नागरिकांनी पेट्रोल पंप व्यवस्थापन आणि प्रशासनाला तातडीने पंपातील पाणी उपसून दुरुस्ती करून सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत पंप सुरू होत नाही तोपर्यंत 128 गावांतील वाहनधारकांना पर्यायी व्यवस्था नसल्याने गैरसोय सहन करावी लागत आहे.प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पेट्रोल पंप व्यवस्थापकाला यावर अतितातडीने उपाययोजना करून तात्काळ नागरिकांच्या सेवेत आणून देऊन पेट्रोल पंप ची सेवा पूर्ववत करण्याचे सूचना केले आहेत आणि प्रशासन याकडे लक्ष घालून असून यावर लवकर तोडगा काढण्यात येणार आहे.
– किशोर बागडे,तहसीलदार, भामरागड













