चामोर्शी: केंद्र गणपूर येथे शिक्षण परिषद आणि सेवापूर्ती सोहळा उत्साहपूर्ण तसेच भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षणातील गुणवत्ता वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी नियोजन करणे आणि शिक्षकांना शैक्षणिक कार्यासाठी नवी दिशा देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाला चामोर्शीचे गटशिक्षणाधिकारी श्री. आखाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी सौ. पोतराजे, केंद्रप्रमुख कपिल सहारे आणि मुख्याध्यापक कल्याणम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण परिषदेत विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शैक्षणिक नवोपक्रम, विद्यार्थीकेंद्री अध्यापन, शाळा विकासाचे नियोजन तसेच शिक्षकांच्या विविध शैक्षणिक जबाबदाऱ्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित शिक्षकांना गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम आणि प्रभावी अध्यापन पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याच कार्यक्रमात गणपूर केंद्रातील प्रदीर्घ शैक्षणिक सेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेले ओमप्रकाश झाडे, मोहन पडिशाला आणि वाटगुरे यांचा सेवापूर्ती निमित्त विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत मान्यवरांनी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थितांनी, “शिक्षक सेवानिवृत्त होतो, पण त्याने दिलेले ज्ञान, संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केलेली प्रेरणा कधीच निवृत्त होत नाही,” असे गौरवोद्गार काढत सेवानिवृत्त शिक्षकांना भावपूर्ण निरोप दिला. त्यामुळे सेवापूर्ती सोहळ्याचे वातावरण भावूक झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्रप्रमुख श्री. कपिल सहारे, श्री. नागरगोजे तसेच गणपूर केंद्रातील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय मेश्राम यांनी केले, तर अम्मावार यांनी आभार प्रदर्शन केले.
शेवटी सेवानिवृत्त शिक्षकांना निरोगी, आनंदी आणि समाधानी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचा सन्मान आणि कृतज्ञतेचा सुंदर संगम घडवून आणणारा हा शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील.













